कहाणी बिहारमधील एका महिला उमेदवाराची

सध्या बिहार या राज्यातील सिवान मतदारसंघाची एका वेगळ्या कारणासाठी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सिवानची जागा आतापर्यंत 6 वेळा कॉंग्रेसने, तीन वेळा राजदने, 2 वेळा भाजपाने, दोन वेळा जनता दलाने आणि भारतीय लोकदल व अपक्षांनी एकेकदा जिंकली आहे. सध्या तेथे भाजपाचे ओम प्रकाश यादव हे खासदार आहेत. 2009 ते 2014 या काळात तेथे अपक्ष खासदार होते. संयुक्‍त जनता दलाने बिहारमधील सीवान लोकसभा मतदारसंघातून दरोंदाच्या आमदार कविता सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्या माजी आमदार जगमातो सिंह यांच्या स्नुषा आहेत. कवितांचे पती अजय सिंह हे बाहुबली म्हणून ओळखले जातात.

ते राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष आहेत. अजय यांच्या नावावर हत्या, लूटमारी आणि अपहरण यांसह जवळपास 30 गुन्हे दाखल आहेत. सध्या रिंगणात असणाऱ्या कविता आणि अजय यांच्या लग्नाची कहाणी मोठी रंजक आहे. 2011च्या सप्टेंबर महिन्यामध्ये “द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगमातो सिंह यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेली दरोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा अजय यांना हातातून जाऊ द्यायची नव्हती. यासाठी त्यांनी पितृपक्षातच विवाह केला, जेणेकरून आपल्या पत्नीला पोटनिवडणुकांमध्ये उमेदवार बनवता येईल. यासाठी अजयने विवाहासाठीची जाहिरात दिली होती.

यामध्ये त्यांनी वधू ही सर्वगुणसंपन्न असावी अशी अपेक्षाही नोंदवली होती. जवळपास 16 मुलींनी ही जाहिरात पाहून अजय यांच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवली होती. त्या सर्व मुलींचा एका आलिशान हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू घेण्यात आला होता. जाहिरातीमध्ये अजयने हेही म्हटले होते की सदर मुलीचे नाव मतदारयादीत असले पाहिजे आणि तिच्याकडे मतदार ओळखपत्रही असले पाहिजे. तसेच मुलीचे वय किमान 20 वर्षे असले पाहिजे. राजकीय पार्श्‍वभूमी असणाऱ्या मुलीला प्राधान्य देईल, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. टेलिग्राफमधील वृत्तानुसार दोन मुलींची निवड करण्यात आली होती. यामध्ये कवितांचा  समावेश होता. त्यावेळी कविता जेपी विद्यापीठात शिक्षण घेत होत्या; तर अजयचे शिक्षण आठवी पास आहे. अजयशी विवाहावेळी त्यांचे वय 25 वर्षे होते. अशा या कविता आता लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. पाहुयात त्या खासदार बनतात का ते !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)