भंडारदराचा साठा अडीच टीएमसी पार 

अकोले – अकोले तालुक्‍यात पावसाची गत मंदावली असून, आज दिवसभर भुरभुर सुरू होती. मात्र भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार बॅटिंग करण्यास पाऊस विसरला नाही. त्यामुळे या धरणातील पाण्याची आवक आज वाढलेली राहिली. दरम्यान रविवारी (दि.7) रात्री भंडारदारा धरणाजवळील वाकी लघुतलाव पूर्ण क्षमतेने भरला, तर आढळा खोऱ्यातील पाडोशी हा लघुजलाशय निम्मा भरला.

अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात आज घाटघरला 6 इंच म्हणजेच 147 मिलिमीटर, रतनवाडीला 6 इंच म्हणजेच 144 मिलिमीटर, पांजरे येथे साडेसहा इंच म्हणजेच 166 मिलिमीटर, वाकी येथे पाच इंच म्हणजे 125 मिलिमीटर, भंडारदरा येथे 129 मिलिमीटर म्हणजेच 5 इंच पावसाची नोंद झाली.

पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग 6 हजार 638 ते 7090 क्‍युसेक इतका राहिला. त्यामुळे मुळा धरणातील पाण्याची आवक वाढून हे धरण पाच टीएमसीच्या पलीकडे गेले आहे. या धरणातील पाणीसाठा आज सकाळी 5047 दशलक्ष घनफूट इतका झाला. या धरणात नव्याने 342 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली.

भंडारदरा धरणामध्ये आज सकाळी 2476 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. गेल्या 24 तासांत या धरणामध्ये 864 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. ती जवळपास पाऊण टीएमसी इतकी होती, तर या धरणामध्ये 2204 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली.
त्याखाली असणारे निळवंडे धरण संथ गतीने आता एक टीएमसीकडे वाटचाल करीत आहे. या धरणात आज सकाळी 814 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता. या धरणात 24 तासांत 202 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. आतापर्यंत या धरणात 264 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. आढळा आणि भोजापूर या धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झालेली नाही, तर जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 18.765 टीएमसी इतका आहे.

भंडारदराच्या जवळ असणारा 112 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचा वाकी लघुजलाशय काल रात्री साडेनऊ वाजता भरला. तर या तलावाच्या सांडव्यावरून 556 क्‍युसेक प्रवाह कृष्णावंती नदीत पडत आहे. तर आढळा खोऱ्यात असणारा 146 दशलक्ष घनफूट साठवणक्षमता असणारा पाडोशी हा तलाव निम्मा भरला. गेल्या 24 तासांमध्ये झालेली पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर-147, रतनवाडी-144, पांजरे-166, वाकी-125, भंडारदरा-129, निळवंडे-56, आढळा- 12 , अकोले-30, कोतूळ-19.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)