#Betterindia: वसा अन्न नासाडी रोखण्याचा…

– कीर्ती कदम

एकीकडे अन्नासाठी दाहीदिशा फिरणारे काही लोक आणि अन्न टाकणारे लोक अशी दोन्ही प्रकारची माणसं पाहून आपण अस्वस्थ होतो. त्यामुळे अन्न वाया जाणार नाही यासाठी अनेक जण ठिकठिकाणी जनजागृती करताना दिसून येतात आणि त्यादृष्टीने कामही करत असतात. घरच्या पातळीपासून ते सार्वजनिक पातळीपर्यंत अन्न वाया जाणार नाही यासाठी दक्ष असतात. पश्‍चिम बंगालच्या असनसोल येथील संगणकशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाने असाच वसा घेतला आहे. भूक मिटवण्यासाठी आणि वाया जाणारे अन्न रोखण्यासाठी त्यांचे सुरू असलेल्या प्रयत्नाला विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची साथ लाभली आहे.

एका महान व्यक्तीचे एक वास्तववादी वाक्‍य म्हटले आहे की, चांगले अन्न वाया घालवणे हे जीवन वाया घालवण्यासारखेच आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक चंद्रशेखर कुंडु यांना एकदा कॅन्टिनमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न वाया गेलेले पाहिले. लोकांनी पैसे मोजूनही ते अन्न टाकून दिल्याचे पाहून धक्‍का बसला. याबाबत त्यांनी चौकशी केली असता अन्न वाया जाणे ही नेहमीचीच बाब असल्याचे कॅन्टिनमालकाने सांगितले. त्यामुळे अन्न वाया घालवण्याऐवजी ते कोणाच्या तरी पोटात जावे असा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे कॅन्टिनमध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुंडू यांनी आवाहन करत मोजकेच अन्न खा आणि गरज तेवढेच ताटात घ्या असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आरटीआयअंतर्गत फूड कॉर्पोरेशनकडे अर्ज करून वाया जाणाऱ्या अन्नाची माहिती मागितली.

आरटीआयकडून मिळालेली आकडेवारी त्यांची झोप उडवणारी ठरली. त्यामुळे अन्न वाचवण्यासाठी आणि ते उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या पोटात जाण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. त्यानंतर शेखर यांनी विद्यार्थ्यांचे एक पथक स्थापन केले. या पथकाने कॅम्पस परिसरात असलेल्या हॉस्टेलचे कॅन्टिन, कॅफेटेरिया आणि खानावळीत नियमित भेट देऊन तेथील अन्नांच्या स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर हॉस्टेल, कॅफेटेरिया आदी ठिकाणी हातही न लावलेले अन्न जमा केले आणि गरजूंपर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर फेसबुकवर पेज तयार करून अन्नबचाव मोहीम सुरू करण्यात आली. विद्यार्थ्याच्या पथकाने तीन लघुपटही तयार केले आणि त्यातून अन्न कसे वाचवता येईल याचा संदेश सर्वत्र पसरवण्यात आला.

कुंडू यांनी एक हॉटलाइन विकसित केली. या हॉटलाइनवर फोन करून शिल्लक राहिलेले अन्न घेऊन जाण्याबाबत विनंती करता येऊ लागली. त्यानुसार कुंडू यांच्या पथकातील विद्यार्थी संबंधितांच्या घरी किंवा ठिकाणी जावून ते अन्न जमा करू लागले. ंयातून जमा केलेले अन्न गरजूपर्यंत पोचवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

कुंडू यांचे कार्य पाहून प्रेरणा घेत अनेक लग्नसमारंभाच्या ठिकाणी जेवण तयार करणारे केटरर्स यांनी तसेच विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भोजन आयोजित करणारे मंडळी हे शिल्लक राहिलेल्या अन्नांची माहिती कुंडू यांना देऊ लागले आणि उपाशी लोकांपर्यंत ते अन्न पोचवण्यासाठी मदत करू लागले. अन्न जमा करणे आणि ते गरजूपर्यंत पोचवणे याचे व्यवस्थापन करणे खूप कठिण काम असल्याचे कुंडू म्हणतात. तरीही विद्यार्थ्यांच्या मदतीने हे व्रत तडीस जात असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर हीच मोहिम भारतीय रेल्वेत देखील राबविण्याची इच्छा आहे. कारण रेल्वेतही अन्नपदार्थाची नासाडी होत असल्याचे आपल्याला ठावूक आहे. रेल्वेत शिजवलेले पण हातही न लावलेले अन्न जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नेटवर्क उभा करणार आहेत. त्यादृष्टीने कुंडू यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यात त्यांना यश येईल, असे निश्‍चित वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)