अतिक्रमण अधिकाऱ्यांची मुजोरी थांबवा

पुणे – अतिक्रमण विभागातील निरीक्षक आणि अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असून त्यांना आवर घालणे आवश्‍यक आहे. कारवाईच्या नावाखाली सर्वाधिक भ्रष्टाचार या विभागात असून अतिक्रमण निरीक्षक हप्ते वसूल करत असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागावर सोमवारी मुख्यसभेत केला.
चार दिवसांपूर्वी हडपसर येथे अतिक्रमण कारवाईवेळी महिला पोलिसांकडून पथारी व्यावसायिक वृद्ध महिलेला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेचे पडसाद सोमवारी मुख्यसभेत उमटले.

नगरसेवक बाळा ओसवाल यांनी अतिक्रमण विभागातील निरीक्षकाच्या गैर कारभाराचा पाढा वाचला. या निरीक्षकाने व्यावसायिकांचा मोबाइल काढून घेतला. त्यानंतर तो मोबाइल पोलीस ठाण्यात मिळाला. त्यानंतर त्या निरीक्षकाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या कामासाठी फोन केल्यानंतर नगरसेवकांना अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गंभीर बाब असून त्याचा विचार करणे आवश्‍यक आहे. संबंधित निरीक्षकावर कारवाईची मागणी ओसवाल यांनी केली.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. अतिक्रमण अधिकारी मस्तवाल झाले आहेत. कारवाई करून रिकाम्या केलेल्या ठिकाणी नातेवाईकांना बसवितात. खोट्या पद्धतीने नातेवाईकांचे बायोमॅट्रीक करून घेतात. व्यावसायिकांना नगरसेवकांची नावे सांगून बदनाम करतात, असाही आरोप त्यांनी केला.

व्यावसायिक महिलांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्‍न उपस्थित करत भविष्यात असे प्रकार घडले तर शांत बसणार नाही, असा इशारा प्रिया गदादे यांनी दिला. महापालिका सभागृहाने 5 हजार रुपये दंड मंजूर करून अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात कोलीत दिले आहे. तेव्हापासून अधिकारी मुजोर झाले आहेत. पैसे मिळवण्यासाठी ते चुकीच्या पद्धतीने व्यावसायिकांची पिळवणूक करत आहेत. कारवाईची भीती दाखवून हफ्ते घेतले जातात. पैसे खाण्यासाठी त्यांची साखळी झालेली आहे. सध्या सर्वाधिक भ्रष्टाचार अतिक्रमण विभागात चालतो. या अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांनाही मुजोरपणे उत्तरे देतात. त्यामुळे या मुजोर अधिकाऱ्यांना आवर घालावा, असे धीरज घाटे म्हणाले.

चौकशी करून कारवाई केली जाईल
नगरसेवकांनी केलेल्या आरोपानंतर अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी मुख्यसभेत खुलासा केला. कामात कसूर करणाऱ्या अतिक्रमण निरीक्षक आणि अधिकाऱ्यांवर आणि खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निरीक्षकाची चौकशी केली जाईल आणि दोषी ठरलेल्या कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच, हडपसर येथील घटनेत प्रथम व्यावसायिक महिलांनी दगडफेक केल्यानंतर पोलीस आणि संबंधित महिलांची झटापट झाली. या प्रकाराची पोलीस चौकशी करत असल्याचेही जगताप यांनी सभागृहात सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)