पाकिस्तानला प्रेमपत्र पाठवणे बंद करा : कॉंग्रेसचा पंतप्रधान मोदींना खोचक टोमणा

इम्रानखान यांना गुपचुप शुभेच्छा संदेश पाठवल्या प्रकरणी केला पलटवार

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनीनिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश पाठवल्याची बाब उघड झाल्यानंतर त्याची संधी घेत कॉंग्रेसने मोदींना त्यांच्याच एका वक्तव्याच्या आधारे खरपुस टोमणा मारला आहे. पाकिस्तानला प्रेम पत्र पाठवणे बंद करा असे कॉंग्रेसने मोदींना सुनावले आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी मोदींनी पाकिस्तान धोरणाच्या बाबतीत कॉंग्रेसवर टीका करताना हेच शब्द प्रयोग वापरले होते तेच शब्दप्रयोग वापरून कॉंग्रेसने त्याची परतफेड केली आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदींचा उल्लेख श्री 56 इंची, पाक पंतप्रधानांना साडी-शालीची भेट देणारा, आयएसआयला भारतात निमंत्रण देणारा असा शेलक्‍या शब्दांत केला आहे. मोदींनी इम्रान खान यांना काल पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमीत्त शुभेच्छा संदेश पाठवला होता ही बाब त्यांनी दडवून ठेवली होती. चौकीदाराने आपले हे कृत्यही दडवून ठेवले होंते. पाकिस्तानला धडा शिकवणे वगैरे बाबी भाजपसाठी केवळ प्रसार माध्यमे आणि टीव्ही चॅनेलवरील सोप ऑपेरासाठीच असतात असा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला आहे. याच मोदींनी गुपचुपपणे इम्रानखान यांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचे गुपित उघड झाल्याने पाकिस्तान को लव्ह लेटर लिखना बंद करो या मोदींच्या जुन्या वक्तव्याचा व्हीडीओही सुर्जेवाला यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)