भाजप सरकारला पायउतार करा : खा. उदयनराजे

प्रचार नियोजन बैठकीला ना. रामराजेंची गैरहजेरी

सातारा – केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार म्हणजे खोट बोलं, पण रेटून बोलं असे आहे. शरद पवारांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी बदल घडवून आणला पाहिजे. देशातील सरकार बदलले नाहीतर बेकारी वाढून भयानक परिस्थिती निर्माण होईल. यासाठी युवकांनी विचार करून मतदान करून भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करावे, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचार नियोजन बैठकीला विधानसभा परिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांची गैरहजेरी दिसून आली. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला होता.

रोजी सकाळी राष्ट्रवादी भवन सातारा येथे बैठकीचे नियोजन केले होते. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी आ. शशिकांत शिंदे, लोकसभेचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले व पक्षाचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होती. या बैठकीला पक्षाच्या आजी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी, माजी नगरसेवक, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, फ्रंटल सेलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांची उपस्थितीही तुरळक होती.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, सर्व आमदारांनी मते मांडली दर पाच वर्षांनी निवडणूका येतात. कोण तरी विजयी होतो. पण उमेदवार निवडून देताना मतदारांनी योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. आज आद्योगिक क्षेत्रात आज मंदी आली आहे. बेकारी वाढली आहे. अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या सरकारने निर्णय घेतले ते चुकीचे आहेत. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार म्हणजे खोट बोल, पण रेटून बोल असे आहे. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी बदल घडवून आणला पाहिजे. युवकांनी विचार करून मतदान करावे. सत्तेत बदल झाला नाही तर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. भविष्याच्यासाठी युवकांनी सत्तातर केले नाही तर बेकारी वाढणार आहे. निश्‍चितपणे मी सुपर मॅन नाही मी सामान्य व्यक्ती आहे. चुका झाल्या असतील तर माफ करा अशी माझी विनंती आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, दोन वेळा निवडून दिले. आता तिसऱ्यांदा शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. उदयनराजे यांना निवडुन देऊन हॅट्रिक करण्यासाठी कामाला लागावे. 24 रोजी होणारी सभा उदयनराजे यांना प्रेरणा देणारी ठरली पाहिजे. जिल्यातील पक्षाच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या सर्वांनी कराडला होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे. जातीयवादी शक्तीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आत्ता पासून कामाला लागा. समोर उमेदवार कोण आहे, हे न बघता उदयनराजे यांना निवडून आणण्यासाठी तयारीला लागा अशा सूचना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केल्या.

सत्यजीत पाटणकर म्हणाले, पाटण तालुक्‍यातुन उदयनराजे यांना प्रचंड मताधिक्‍य देण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. इतर तालुक्‍यापेक्षा निश्‍चित पाटण तालुक्‍यातून दिले जाणार आहे. मतांचा आकडा आता सांगणार नाही, कृतीतून करून दाखवणार आहे, असे सांगितले. आ. मकरंद पाटील म्हणाले, आमचा वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा या तीन तालुक्‍यातील जनता पक्षाच्या उमेदवार खा. उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गेल्यावेळी मतदान झाले त्या पेक्षा यावेळी या तीन तालुक्‍यातील मते निश्‍चित पणे अधिक असेल अशी मी खात्रीशीर सांगतो.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सर्वांनी मते मांडली आहेत. कराडला प्रचार सभा आयोजित केली आहे. ही सभा यशस्वी करायची आहे. शरद पवारांच्या विचाराला जनतेने नेहमीच साथ दिली आहे. सातारा, जावली या दोन तालुक्‍यातील आमचे कार्यकर्ते पक्षाचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांचे काम करतील, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)