स्मार्टकार्डबाबत एसटी वाहकांमध्ये संभ्रम! 

संग्रहित छायाचित्र

नगर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हायटेक होत ऑनलाइन स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र तिकीट वितरण करणाऱ्या मशीनमध्ये ती प्रक्रिया अपडेट न झाल्याने एसटी वाहकांमध्ये संभ्रम आहे.त्यामुळे अनेक सवलतधारकांना सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. परंपरागत पद्धतीने कामाची सवय असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून प्रशिक्षण देण्याची गरज भासत आहे.

मागकल वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिक, मासिक पास, स्वातंत्र्यसैनिक, एसटी कर्मचारी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, आमदार यांना मॅन्युअल एसटी कार्ड दिले जायचे. हे कार्ड दाखविले की, एसटीवाहक त्याची नोंद घेत असे. त्यातही अनेकदा ही सेवा या गाडीत नाही म्हणून सवलतधारकांना सेवा नाकारली जायची. यातून मार्ग काढून महामंडळाने ऑनलाइन हायटेक प्रणालीचा अंमल सुरू केला अन्‌ राज्यभरात स्मार्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मागील महिन्यापासून डेपोनिहाय स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक डेपोतील ज्येष्ठ नागरिक, मासिक पास, स्वातंत्र्य सैनिक, एसटी कर्मचारी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, आमदार यांची नोंद ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे.

संपूर्ण राज्यातील सवलतधारकांना आता स्मार्ट कार्ड दिले जात असले तरी एसटी वाहक यापासून अनभिज्ञ आहे. हे कार्ड चालत नाही, दुसऱ्या बसगाडीत बसा, असा सल्ला प्रवाशांना दिल्या जात आहे. त्यामुळे पासधारकांना सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. महामंडळाने विभागस्तरावर एसटी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यातून धडे देण्याची गरज आहे, अन्यथा यातून तक्रारी, वाद उद्भवण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे.

स्मार्ट कार्ड वितरणासोबतच राज्यातील वाहकांच्या मीटर मशीनवर ऍप अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहकांना याबाबत माहिती नाही. मीटर अपडेट झाल्यानंतर चालक-वाहकांना याबाबत अवगत करण्याबाबतही मोहीम राबविली जाणार आहे. असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)