अबाऊट टर्न : स्टेटस…

हिमांशू

सोशल मीडियाच्या आगमनापूर्वी “स्टेटस’ हा शब्द आम्हाला “प्रतिष्ठा’ या अर्थानं ठाऊक होता. हा शब्दार्थ बरोबर की चूक, हे अजूनही समजलेलं नाही हा भाग वेगळा; पण सोशल मीडियाचं स्टेटस हा रकाना आम्ही आजअखेर रिकामाच ठेवलाय. एकतर आम्हाला ठाऊक असलेल्या अर्थानं विचार केल्यास आम्हाला “स्टेटस’ नाहीच! परंतु हा रकाना भरणं आणि वारंवार बदलणं हा एक छंदच अनेकांना जडल्याचं आम्ही पाहतो. माणसं पिकनिकला जातात आणि जिथं कुठं असतील, तिथून “एन्जॉइंग अमूक-तमूक ट्रिप’ असं स्टेटस टाकतात. मग त्यांना ओळखणारी माणसं त्यांना अंगठे दाखवतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंगठा दाखवण्याचाही वेगळाच अर्थ आमच्या अंगवळणी पडल्यामुळं आम्ही अभिनंदनार्थ अंगठा दाखवत नाही. सरळसरळ “अभिनंदन’ असा शब्द टाइप करतो. वरचेवर स्टेटस बदलणाऱ्या माणसांबद्दल मात्र आम्हाला विलक्षण कुतूहल आहे. मी सध्या जेवतो आहे किंवा मला झोप आली आहे, असंही स्टेटस काहीजण ठेवतात म्हणे! परंतु या अतिउत्साही मंडळींना “जरा जपून’ असा सल्ला देण्याची वेळ आता आलीये एवढं खरं. आपण ज्या कोणत्या कंपनीकडून सोशल माध्यमाची सेवा घेतो, त्या कंपनीचं आपल्या स्टेटसवर लक्ष असतं, हे समजल्यापासून आम्हाला आमच्या इतर मजकुराच्या गोपनीयतेचीही चिंता वाटू लागलीय. आपण सोशल मीडियावर काही वेगळं बोललो, तर भलताच गहजब होण्याची शक्‍यता आहे.

सोशल मीडियावरची भाषा त्या विश्‍वात राहणाऱ्यांनाच अधिक परिचित असते. आम्ही सोशल मीडियावर इतकं “सरळ’ कसं काय लिहितो, असा प्रश्‍न आम्हाला अनेकांनी विचारला. परंतु आम्हाला सरळ भाषाच येते, हा आमचा दोष! शब्दांची मोडतोड अद्याप साधलेली नाही. साधेल हळूहळू… पण… आशयाचीच मोडतोड करायची म्हणजे कठीण आहे! अमेरिकेच्या ओहायो प्रांतात एक महिला दिवसभर इतकी व्यस्त होती की, रात्री घरी आल्यावर काही करण्यासाठी तिच्या अंगात त्राणच उरलं नाही. परंतु कितीही दमणूक झाली तरी स्टेटस बदलण्याचं त्राण मात्र असतंच. या महिलेनं स्टेटस लिहिलं, “धावपळीला कंटाळलेय. वाटतं आत्महत्या करावी, म्हणजे सुटेन एकदाची!’ हे स्टेटस तिनं रात्री दीड वाजता टाकलं आणि लगेच झोपी गेली. परंतु अर्ध्या तासातच दारावरची बेल वाजली.

महिलेनं दार उघडलं तर डझनभर पोलिस दारात उभे! एवढ्या रात्री आपल्या घरी पोलिस आल्याचं पाहून महिला घाबरली. येण्याचं कारण विचारलं, तेव्हा पोलीस म्हणाले, “आम्ही तुम्हाला मरू देणार नाही. तुम्ही आत्महत्या करू शकत नाही.’ पोलीस एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली केलं. झोपेचं खोबरं झालंच होतं, शिवाय हे भलतंच लचांड!

नंतर समजलं की, तिच्या स्टेटसमध्ये “आत्महत्या’ हा शब्द वाचून फेसबुकनंच पोलिसांना खबर दिली होती. थोडक्‍यात, आपल्या मनात जे चाललंय, यावर फेसबुक, व्हॉट्‌स ऍप नावाच्या पहारेकऱ्यांचं लक्ष आहे. उद्या एखाद्यानं “हम तुमपे मरते है’ असं स्टेटस टाकलं तर त्यातला “मरते है’ एवढाच शब्द फेसबुकला समजेल आणि भलती आफत ओढवेल. तेव्हा चारचौघात “स्टेटस’ राखायचं असेल तर सोशल मीडियावरील “स्टेटस’च्या अधिक प्रेमात न पडलेलं बरं, हाच या घटनेचा धडा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)