2014 मधील स्थिती आणि बदलत गेलेले बलाबल

दक्षिणेकडील राज्ये : दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 129 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक वगळता अन्य सर्व राज्यांत प्रादेशिक पक्षांनी आपला वरचष्मा राखला होता. अण्णा द्रमुकने तमिळनाडूमध्ये 39 पैकी 37 जागा जिंकल्या होत्या; तर आंध्र प्रदेशातील 25 पैकी 15 जागा तेलगू देसम पार्टीने जिंकल्या होत्या. तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागा असूूून टीआरएसने यापैकी 11 जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकात भाजपाने 28 पैकी 17 जागांवर विजय मिळवला होता; पण अन्य चार राज्यांत भाजपाचे केवळ चारच उमेदवार विजयी झाले. केरळमध्ये भाजपाला खातेही उघडता आले नव्हते. कॉंग्रेसचा विचार करता या पक्षाला कर्नाटकात 9 आणि केरळमध्ये 20 पैकी 8 जागांवर विजय मिळवता आला होता. तेलंगणात कॉंग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेसने 8, तर तेलंगणात एका जागेवर विजय मिळवला होता. यंदाच्या लोकसभांसाठी तमिळनाडूत भाजपाने अण्णा द्रमुकसोबत युती केली आहे; तर द्रमुकने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे. कर्नाटकात जनता दल (एस) आणि कॉंग्रेस यांची आघाडी आहे.

बंगाल आणि पूर्वोत्तर राज्ये : पश्‍चिम बंगालमधील 42 जागांवर सत्तारुढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात टक्‍कर होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेसने 34 जागांवर विजय मिळवला होता; तर भाजपाने 2 आणि कॉंग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. स्थानिक निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपानंतर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली.

एकेकाळी कॉंग्रेसचा गड राहिलेल्या आसाम आणि ईशान्येकडील सात राज्यांमध्य आज कुठेही कॉंग्रेस सत्तेत नाही. भाजपाने मात्र प्रादेशिक पक्षांच्या सोबतीने सत्तेचा सुकाणू हाती घेतलेला आहे. या आठ राज्यांत लोकसभेच्या 25 जागा आहेत. आसाममधील 14 जागांपैकी 7 जागांवर 2014 मध्ये भाजपाने विजय मिळवला होता. कॉंग्रेसला तीन आणि अन्य पक्षांना चार जागा मिळाल्या होत्या. अरुणाचल प्रदेशात कॉंग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा जिंकली होती.

मणिपूरच्या दोन्ही जागा कॉंग्रेसने पटकावल्या होत्या; मात्र तेथे विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाचे सरकार सत्तेत आले. मेघालयमधील दोन जागांपैकी एक कॉंग्रेसने आणि एक एनपीपीने जिंकली होती. मिझोराममध्ये लोकसभेची एकच जागा असूून ती कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. नागालॅंडमध्ये एनपीएफ आणि सिक्‍कीममध्ये एसडीडीएएफ या पक्षांनी एक-एक जागा जिंकलेली आहे. त्रिपुरामधील लोकसभेच्या दोन्ही जागांवर गतवेळी डाव्या आघाडीने विजय मिळवला होता; पण 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत या राज्यात भाजपाने विजय मिळवून सरकार स्थापन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)