राज्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा

 8 लाख 66 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी रविवारी (दि.24) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला राज्यात एकूण 8 लाख 65 हजार 984 विद्यार्थी बसणार असून 5 हजार 869 केंद्रांवर ती होणार आहे. जिल्हानिहाय भरारी पथकेही तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी ही शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 12 हजार 667 तर इयत्ता आठवीसाठी 3 लाख 53 हजार 317 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. इयत्ता पाचवीची परीक्षा ही 3 हजार 428 केंद्रांवर होणार असून यासाठी प्रत्येकी एका केंद्र संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, 24 हजार 592 पर्यवेक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी 2 हजार 441 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येकी एक केंद्र संचालकांबरोबरच एकूण 17 हजार 564 पर्यवेक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. इयत्ता पाचवी व आठवीसाठी एकूण 8 लाख 65 हजार 984 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यासाठी एकूण 43 हजार 562 पर्यवेक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती विभागाच्या उपायुक्त स्मिता गौड व अधिक्षक संजय काळे यांनी दिली.

इयत्ता पाचवीसाठी सर्वाधिक विद्यार्थी पुणे जिल्ह्यातून 52 हजार 888 तर, सर्वांत कमी गडचिरोली जिल्ह्यातून 4 हजार 69 परीक्षेला बसणार आहेत. इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठीही सर्वांत जास्त विद्यार्थी पुण्यातीलच असून ती संख्या 29 हजार 405 एवढी आहे. तर सर्वांत कमी दक्षिण मुंबईमधून 4 हजार 1 एवढी विद्यार्थी संख्या आहे.

नवीन बदलेल्या वेळेनुसार परीक्षेचा पेपर 1 हा दुपारी 1 ते 2.30 तर पेपर 2 हा दुपारी 3.30 ते 5 यावेळेत होणार आहे. अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेशासाठी इयत्ता पाचवीचे 1 हजार 484 विद्यार्थी शिष्यवृत्तीचीही परीक्षा देणार आहेत. त्यांच्यासाठी 12 केंद्रांची व्यवस्था राज्यात करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्हानिहाय भरारी पथकाच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी या अधिकाऱ्यांचे परीक्षा केंद्रांवर नियंत्रण कायम राहणार आहे. जिल्हास्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेही अधिकाऱ्यांना परीक्षेबाबतच्या सर्व महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वच केंद्रसंचालकांची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे गौड व काळे यांनी स्षष्ट सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)