राज्यात आघाडीचाच झेंडा फडकणार; आमदार बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

संगमनेर: कॉंग्रेसचे तत्त्वज्ञान शाश्‍वत आहे. कॉंग्रेसला संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे कोणत्याही लाटेने कॉंग्रेस संपणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकजुटीने आगामी विधानसभा निवडणूक लढवेल आणि राज्यात परिवर्तन घडवून आणेल, असा विश्‍वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहता येथे बोलताना व्यक्त केला.

राहता येथे कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधीर म्हस्के, बाळासाहेब केरू विखे, सिमोन जगताप, विक्रम दंडवते, विजय जगताप, एकनाथराव घोगरे, सदाशिव वरपे, सुभाष निर्मळ, रमेश घागरे, श्रीकांत मापारी, रावसाहेब मोठे, नंदू सदाफळ, बाळासाहेब गिधाड, सचिन गाडेकर उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे आमची आघाडी मजबुतीने निवडणुकांना सामोरे जाईल. लवकरच जिल्ह्यातील कॉंग्रेसची संघटनात्मक बांधणीही पूर्ण केली जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये परस्परविरोधी निकाल लागल्याचा आजवरचा इतिहास आहे. 1999 पासूनच्या निवडणुकांत सातत्याने असेच घडत आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागा.

राहात्यात विजयासाठीच लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेस जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये विजयाची क्षमता व जन-सामान्यांशी बांधिलकी असलेले उमेदवार उभे करणार आहे. राहाता मतदारसंघातही सर्वानुमते येत्या विधानसभा निवडणुकीत चांगला उमेदवार देऊ आणि परिवर्तन घडवू, असेही थोरात यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)