हवेली तालुक्‍यातील राजकीय हवा निर्णायक

38 गावांतील मतदारांवर भिस्त : राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची सुप्तावस्था

– राजेंद्र काळभोर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणी काळभोर – शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकिट कुणाला मिळणार, यावर पुढील राजकारणाची दिशा आणि दशा ठरणार आहे. एकाला तिकीट मिळाल्यावर दुसरा बंडखोरी करणार की दुसऱ्या पक्षाचे तिकिट पदरात पाडून घेणार, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीनंतर ठरणार आहे. मात्र, हवेली तालुक्‍यात 38 गावांतील मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची सुप्तावस्था आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन टर्ममध्ये हवेलीने धाकट्या भावाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे यंदा थोरला भाऊ धाकल्या भावांसाठी माघार घेणार काय, अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व गटांनी एकदिलाने प्रचार केला. प्रचाराच्या काळात राष्ट्रवादीचे सर्व गट एकत्र झाले होते. त्यामुळे विजयश्री संपादन करण्यास राष्ट्रवादीला यश मिळाले. कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली. त्याचा फायदा पक्षाला होईल, हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी कोल्हे यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेतले. शिरुर लोकसभा मतदारसंघात तिकीट दिले. त्यांनी विजय खेचून आणला.

शिरुर विधानसभा मतदारसंघातही कोल्हे यांना निर्णायक आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांमध्ये आशेची पालवी फुटली आहे. लोकसभेचे कवित्व संपल्यावर आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल हे प्रमुख इच्छुक आहेत. 2014 च्या निवडणुकीत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी अशोक पवार यांचा पराभव केला होता. काही वेगळे घडले नाही तर आमदार पाचर्णे यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

शिरुर तालुक्‍यातून अशोक पवार हे तिकीटासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांनाच मिळेल व ते विजय मिळवतील, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील एक प्रमुख दावेदार आहेत. जिल्हा परिषदेचे अडीच वर्षे उपाध्यक्ष व अडीच वर्षे अध्यक्षपद अशी पाच वर्षं ते सत्तेच्या सर्वोच्चस्थानी होते. या पाच वर्षाच्या काळात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात चांगले नेटवर्क तयार केले होते. आपल्याला पुढे शिरुर- हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुक लढवायची आहे, हा हेतू मनात ठेवूनच त्यांनी संपूर्ण मतदारसंघात निधीचे वाटप केले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना तयार झालेले नवीन राजकीय व वैयक्‍तिक संबंधांची त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मदत होणार आहे, हे नक्‍की आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रदीप कंद यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. कंद यांना फार मोठा धक्का आहे, असे राजकीय समीक्षकांचे मत आहे. मात्र, एका निवडणुकीतील पराभवामुळे कुठलाही नेता किंवा एखादा पक्ष कधीच संपत नसतो, हे या समीक्षकांनी ध्यानात घ्यायला हवे आहे. माध्यमांशी बोलताना प्रदीप कंद यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. आपण आगामी विधानसभा निवडणुक कुठल्याही परिस्थितीत लढवणारच आहोत, असाही ठाम निर्धार त्यांनी व्यक्‍त केला आहे. दुसरीकडे आमदार पाचर्णे, माजी आमदार पवार, बांदल या इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीबाबतीत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, प्रत्येकाची निवडणुकीची तयारी आपापल्या पद्धतीने सुरू आहे.

दिसायला सोपी; परंतु जिंकायला अवघड
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच गट लोकसभा निवडणुकीप्रमाणे एकजीव होऊन लढले तर विजय अशक्‍य नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्व गट एकत्र झाले होते. त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सर्व गट एकत्र येऊन निवडणूक लढतील, ही शक्‍यता फारच धुसर बनत चालली आहे. कारण प्रत्येक गटाला आपलाच नेता आमदार झालेला पहायचे आहे. म्हणून शिरूर- हवेलीचा आखाडा दिसायला एकदम सोपा आहे. परंतु मैदानात फारच खडाखडी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)