पुणे – कुमारांच्या (19 वर्षाखालील) राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेस सोमवारपासून येथे प्रारंभ होत असून या स्पर्धेत तीनशेहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. ही 15 ते 19 जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेतर्फे मॉडर्न क्रीडा संकुलात होणार आहे.
या स्पर्धेतील मुलांच्या एकेरीत ठाण्याच्या रोहन ठोले व राहुल काणे यांना अनुक्रमे पहिली दोन मानांकने देण्यात आली आहेत. दुहेरीत यश शहा व हर्शल जाधव या जोडीस अग्रमानांकन देण्यात आले आहे. शंतनु पवार व वेदांत काळे यांना द्वितीय मानांकन मिळाले आहे. मुलींच्या एकेरीत रिया हब्बू हिला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
तारा शहा हिने दुसरे मानांकन मिळविले आहे. दुहेरीत रिया कुंजीर व तनिष्का देशपांडे ही जोडी अव्वल मानांकित असून रिया हब्बू व ऋचा सावंत या जोडीला दुसरे मानांकन मिळाले आहे. मिश्रदुहेरीकरिता यश शहा व तनिष्का देशपांडे यांना अग्रमानांकन तर आदित्य रेड्डी व समृद्धी क्षत्रिय यांना द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी ठिकाणच्या नामवंत खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील खेळाडूंची निवड केली जाणार आहे.