उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागणीस प्रारंभ

जादा दराच्या अपेक्षेने उत्पादनात होतेय वाढ

अतिरिक्त उत्पादन झाल्यास दर पडतात. उन्हाळी हंगामात नैसर्गिकरित्या एखाद्या ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसल्यास टोमॅटोचे उत्पादन कमी होते. त्याचा फायदा दर वाढीस होतो. बाजारपेठेत इतर तरकारी पिकांची आवक कमी झाल्यास दर वाढतात. त्यामुळे टोमॅटोच्या दराचे गणित कळणे जरा कठीणच होत असते.

कोपर्डे हवेली – कराड तालुक्‍यातील कोपर्डे हवेली परिसरातील शेतकरी ऊसाच्या नगदी पिकासोबत टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असतात. सध्या उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या लागणीस शेतकऱ्यांनी प्रारंभ केला असल्याचे चित्र शिवारात दिसून लागले आहे. टोमॅटोचे पीक तिन्ही हंगामात शेतकरी घेत असतात. इतर दोन हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आव्हानात्मक असते. उन्हामुळे या पिकाला वाढत्या तापमानाचा सामना करावा लागतो. तसेच वादळी वाऱ्याबरोबर अवकाळी पावसाचा धोकाही असतो. शेतकरी धोका पत्करुन टोमॅटोचे उत्पादन घेतात. इतर दोन्ही हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामातील टोमॅटोला दर चांगला मिळतो, असा शेतकऱ्यांना विश्वास आहे.

अलिकडच्या काळात टोमॅटोच्या दराबाबत बाजारपेठेत अनिश्‍चितता राहिली आहे. कोपर्डे हवेली परिसरातील कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, पार्ले, नडशी, शिरवडे आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतात. या परिसरात सध्या टोमॅटो लागणीस प्रारंभ झाला असून तोडणीची कामे जून, जुलै महिन्यात सुरू होतील, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गत काही वर्षापासून टोमॅटो पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून त्या तुलनेत बाजारपेठेत दरात वाढ झालेली दिसून येत नाही. काही विभागात अपवादात्मक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याची उदाहरणे पहावयास मिळत आहेत. यावर्षी तरी चांगला दर मिळेल अशी आशा शेतकरी राजा बाळगून असून त्यादृष्टीने टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे.

उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागणीस प्रारंभ

अलिकडच्या काळात टोमॅटोला बाजारपेठेत चांगल्या दराचे सातत्य राहिलेले नाही. दराच्या बाबतीत हे पीक जुगार ठरत आहे. परंतु आम्ही गेल्या आठ ते दहा वर्षांपासून टोमॅटोचे पीक घेत असून हे पीक निघाल्यानंतर त्याच तारेवर काकडी पीक घेत असतो. भाऊसाहेब चव्हाण, शेतकरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)