पुण्यात फुटलेय मेट्रो मार्गांचे “पेव’

आणखी तीन विस्तारीत मार्गांना स्थायीची मान्यता

अवघ्या महिनाभरातील सहावा विस्तारीत मार्ग

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येताच; मतदारांना खुश करण्यासाठी तसेच भविष्यात आपल्याही भागात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे श्रेय घेण्याची लढाई महापालिकेत सुरू झाली आहे. त्यातूनच, स्थायी समितीच्या सलग चौथ्या बैठकीत पुणे मेट्रोच्या आणखी तीन मार्गांचा “डीपीआर’ अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरात स्थायी समितीने पुणे मेट्रोचे सहा मार्गांवर विस्तारीकरण करण्यासाठी “डीपीआर’ खर्चास मान्यता दिली आहे. परिणामी, शहरातील आता प्रत्येक रस्त्यावर मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत स्वारगेट-खडकवासला आणि स्वारगेट-हडपसर या मार्गांवर मेट्रो मार्ग विस्तारीत करण्यासाठी “डीपीआर’ तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. स्वारगेट खडकवासला मेट्रो मार्गामुळे दत्तवाडी, हिंगणेखुर्द, वडगाव बु., धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. नगरसेवक हरिदास चरवड, दिलीप वेडे पाटील, सुनील कांबळे, आबा तुपे, मंजुषा नागपुरे यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. स्वारगेट ते हडपसर मेट्रोचा प्रस्ताव नगरसेवक रंजना टिळेकर, आबा तुपे, सुनील कांबळे, संगीता ठोसर यांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. तर, कात्रज ते वारजे-शिवणे असा मेट्रो मार्गाचा “डीपीआर’ तयार करून तो राज्य केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात यावा, हा “डीपीआर’ तयार करण्यासाठी येणार खर्च हा पुणे महानगरपालिकेने करावा, असा प्रस्ताव नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी ठेवला होता. या तीनही प्रस्तावांना समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेवर पडणार आर्थिक बोजा
स्थायी समितीने या तीन मार्गांसह गेल्या तीन बैठकांमध्ये आणखी काही मार्गांना मान्यता दिली आहे. त्यात, वनाज-चांदणी चौक, पौड-फाटा ते शिवणे आणि रामवाडी ते खराडी आणि विमानतळ या मार्गांचा समावेश आहे. प्रस्तावानुसार या मार्गांचा आराखडा महामेट्रोने तयार करावा, तसेच त्यासाठी आवश्‍यक असलेला निधी महापालिकेकडून दिला जाणार आहे. मात्र, अशा प्रकारे सरसकट प्रत्येक रस्त्यावर मेट्रोच्या आराखड्यास परवानगी देण्यात येत असल्याने पालिकेच्या तिजोरीवर ताण येण्यची शक्‍यता आहे. महामेट्रोने सध्या स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण केले असून त्यासाठी महापालिकेने सुमारे 80 लाख रूपयांचा खर्च उचलला आहे. त्यामुळे या सहा मार्गांसाठी महापालिकेस आणखी 5 ते 6 कोटींचा खर्च उचलावा लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)