स्थायी समिती अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

मेट्रो कंत्राटदाराच्या बाउंसरकडून महापालिका मुख्यालयासमोरच गैरवर्तन

पिंपरी –  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महामेट्रोकडून रस्ता अडवून काम सुरू ठेवण्याचा फटका स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनाही बसला. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या बाउंसरकडून स्थायी समिती अध्यक्षांना थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.9) रात्री नऊ वाजता घडला. ऐनवेळी घटनास्थळी पोलीस पोहचल्याने मडिगेरी थोडक्‍यात बचावले.

मंगळवारी (दि.10) रात्री सव्वादहाच्या सुमारास मडिगेरी सहकाऱ्यांना सोडविण्यासाठी महापालिका भवनाच्या दिशेने गाडीतून निघाले होते. अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ महामेट्रोच्या कामासाठी महामार्ग बंद करण्यात आला होता. काम थोडावेळ थांबवून वाहन पुढे जाऊ देण्याची कामगारांना विनंती केली. मात्र, तुम्ही वाहन पुढे नेऊ शकत नाहीत.

तुम्हाला काय करायचे ते करा, अशी अरेरावी केली. त्यानंतर पाच-सहा बाऊन्सर याठिकाणी आले. या बाऊन्सरनी “मला माहित आहे, तू स्थायी समिती सभापती आहेस, फ्लेक्‍सवर पाहतो तुझे फोटो. इथून आत्ताच्या निघून जा, नाहीतर तू उद्याची सकाळ पाहणार नाहीस’, अशी जिवे मारण्याची धमकी देत, पाच-सहा जणांचा जमाव त्यांच्यावर चालून आला. वेळीच पोलीस घटनास्थळी आल्याने चार जणांनी पळ काढला.

मनामानी कारभाराला पायबंद घालणार : मडिगेरी
स्थायी समिती अध्यक्षांनाच महामेट्रोच्या गुंडांकडून अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना याचा कितीतरी पटींनी अधिक त्रास सहन करावा लागत असणार आहे. या मनमानी कारभाराला पायबंद घालण्यासाठी महामेट्रोचे काम काही दिवस थांबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी आपला संताप व्यक्‍त केला.

प्रकरणाची चौकशी सुरू महामेट्रोच्या जनसंपर्क व मानव संसाधन विभागाचे सरव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, येथे सुरु असलेल्या कामाबाबत वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊनच बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत. झालेल्या प्रकरणाबाबत मेट्रोच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत आवश्‍यक ती कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)