शिरूरमधील 388 केंद्रांवर कर्मचारी पोहोचले

शिरूर – शिरूर लोकसभा मतदारसंघाची सोमवारी (दि. 29) निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि. 28) दुपारी तीनवाजेपर्यंत सर्वच्या सर्व 388 मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहोचले असून सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी सुरुवात होणार आहे, असे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी सांगितले.

शिरूर लोकसभेसाठी सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी शिरूर विधानसभा मतदासंघात रविवारी (दि. 28) सकाळपासुनच कुकडी वसाहत शिरूर येथे लगीनघाई सुरू होती. तर या निवडणुकीसाठी प्रशासन सतर्क असून मतदानयंत्र बिघाड व मार्गदर्शनसाठी मतदानयंत्र इंजिनिअर, मतदानयंत्र मास्टर ट्रेनर यांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासुनच शासकीय कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप, त्याचे नेमणूक केलेले ठिकाण, तेथील त्यांचे सहकारी यांची जुळवा-जुळवा करीत होते. काही जण मतदान साहित्य तपासून पहात होते तर काहीजण लांब नेमणूक झाली असल्याने नाराज होते. साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती; परंतु निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी मतदान केंद्र निहाय साहित्य वाटप करण्यासाठी वेगवेगळे स्टॉल व त्याबाहेर मतदान केंद्रांचे क्रमांक, तसेच बाहेर मोठे फ्लेक्‍स लावून मतदान केंद्र व साहित्य वाटप स्टॉल नंबर, जाण्यासाठी बस, जीपचे नंबर लिहिले होते, त्यामुळे नेमणूक अधिकाऱ्यांना मतदान साहित्य घेण्यासाठी सोपे जात होते.

हजार पुरुषांमागे 917 महिला – पाटोळे
शिरूर लोकसभा मतदारसंघातील 198 विधानसभेची पूर्ण तयारी झाली असून, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 3 लाख 69 हजार 872 मतदार असून यामध्ये 1 लाख 93 हजार 76 पुरुष तर 1 लाख 76 हजार 791 महिला मतदार आहेत. मतदारसंघांमध्ये हजार पुरुषांमागे 917 महिला मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरूर शहरात 30 मतदार केंद्रे
शिरूर तालुक्‍यातील 95 हजार 710 पुरुष, 89 हजार 680 महिला मतदार असे एकूण 1 लाख 85 हजार 391 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. तर शिरूर शहरात 30 मतदार केंद्र व दोन साह्यकारी मतदान केंद्रातून 14 हजार 536 पुरुष व 14 हजार 208 महिला मतदार असे एकूण 28 हजार 744 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये 388 मतदान केंद्र असणार असून 427 टीम व त्यासाठी एकूण 2562 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर 30 झोन व 30 झोनल अधिकारी नेमले असून, मतदानकेंद्रावर जाण्यासाठी 66 एसटी बस, 12 मिनी बस, 8 जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणूक मतदान व्यवस्थित पार पडावे, कायदासुव्यवस्था राखावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, 11 पोलीस उपनिरीक्षक, 113 पोलीस कर्मचारी, एसआरपी जवानांची एक तुकडी, ट्रायकिंग फोर्सच्या दोन तुकड्या असा एकूण 265 जणांचा बंदोबस्त शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव हद्दीत ठेवण्यात आला आहे.
– नारायण सारंगकर, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)