पुणे – ओम क्रिकेट ऍकॅडमी संघाने 12 आणि 14 वर्षाखालील गटात आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद’ स्पर्धेत डबल धमाका केला.
स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात रणंजय देशमुख याने केलेल्या 48 धावांच्या जोरावर ओम क्रिकेट ऍकॅडमीने रमणबाग इलेव्हन संघाचा 40 धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ओम क्रिकेट ऍकॅडमीने 27 षटकांत 1 गडी गमावून 154 धावा फटकावल्या. रणंजय देशमुख याने नाबाद 48 धावा केल्या. त्याचबरोबर तुशार शर्मा (18 धावा) व राज शुल्का (10) यांनीही छोट्या धावा करून हातभार लावला. रणंजय आणि राज यांनी दुसऱ्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी करून संघाला दिडशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना रमणबाग इलेव्हनचा डाव 27 षटकांत 6 गडी गमावून 114 धावा केल्या. पण संघाला विजयासाठी 40 धावा अपुऱ्या पडल्या.
14 वर्षाखालील गटातही ओम क्रिकेट ऍकॅडमीने विजय संपादन केला. आशिष खोकर याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ओम संघाने रमणबाग इलेव्हनचा 45 धावांनी पराभव केला. ओम संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 30 षटकांत 6 गडी गमावून 162 धावा केल्या. यामध्ये कविश बडेरा (48 धावा), अर्थव ढोरे (21) आणि ओम साळुंखे (25) यांच्या फलंदाजीमुळे संघाने 160 धावांचा टप्पा पूर्ण केला. ओम संघाच्या आशिष खोकर याने गोलंदाजीमध्ये कमाल करताना 16 धावात 5 गडी बाद करत रमणबाग संघाचा निम्मा संघ परत पाठवला. यामुळे रमणबाग इलेव्हनचा डाव 21.5 षटकांत 117 धावांवर आटोपला. आशिषसह अर्थव ढोरे (2-32) आणि ओम साळुंखे (2-18) यांनीही अचूक गोलंदाजी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.
सविस्तर निकाल –
12 वर्षाखालील गट : ओम क्रिकेट ऍकॅडमी ः 27 षटकांत 1 बाद 154 (रणंजय देशमुख नाबाद 48, तुशार शर्मा 18, राज शुल्का 10, शिवम गायकवाड 1-33) वि.वि. रमणबाग इलेव्हनः 27 षटकांत 6 बाद 114 (सिध्देश लालबेगी 20, रणंजय देशमुख 2-24, निश्चय ओझा 1-14); सामनावीरः रणंजय देशमुख.
14 वर्षाखालील गट ः ओम क्रिकेट ऍकॅडमी ः 30 षटकांत 6 बाद 162 (कविश बडेरा 48, अर्थव ढोरे 21, ओम साळुंखे 25, स्वप्निल जयभय 3-20) वि.वि. रमणबाग इलेव्हन ः 21.5 षटकांत सर्वबाद 117 (समर्थ काळभोर 37, स्वप्निल जयभय 10, सिध्देश लालबिगे 11, आशिष खोकर 5-16, अर्थव ढोरे 2-32, ओम साळुंखे 2-18); सामनावीरः आशिष खोकर.