लोणंद नीरा रोडवर अपघातांची मालिका कायम
लोणंद – लोणंद-निरा रोडवरील बाळुपाटलाची वाडी स्टॉपजवळ बुधवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे येथून फलटणच्या दिशेने फलटण आगाराची चालक प्रताप संपत फडतरे (रा. फडतरवाडी, ता. फलटण) यांच्या ताब्यातील एसटी बस क्रमांक एम एच 11 बी एल 9357 व लोणंदवरून निरेच्या दिशेने चाललेल्या कार क्रमांक एम एच 02-6609 यांच्यात रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास बाळुपाटलाची वाडी फाट्यानजीक समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे.
या अपघातात कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर एकजण किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे. जखमींना तातडीने लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी गंभीर जखमींना खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघातात कारमधील शिवाजी कांतीलाल शेळके (रा. मिरेवाडी, ता फलटण), जानकीबाई कांतीलाल शेळके मिरेवाडी, ता. फलटण, अतुल भीमराव बंडगर (रा. होलेवाडी, ता. कोरेगाव) अशी जखमींची नावे आहेत. सदर अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा पुढील तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि गिरिश दिघावकर हे करीत आहेत.
लोणंद-निरा रोडवर सातत्याने होणाऱ्या अपघातांना सदोष रस्ता जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. या सात किलोमीटरच्या रस्त्यावर सात ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे. अशा अपघाताची शक्यता असणाऱ्या ठिकाणी योग्य ती काळजी वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून घेतली जात नाही.
कय्युमभाई मुल्ला सामाजिक कार्यकर्ते