गेल्या वर्षी 94.33 टक्के विद्यार्थी झाले होते उत्तीर्ण
पिंपरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 86.49 टक्के लागला आहे. यामध्ये, मुलींचे निकालाचे प्रमाण 90.94 टक्के तर मुलांचे 82.63 टक्के आहे. गतवर्षी शहराचा निकाल 94.33 टक्के निकाल लागला होता. यामध्ये, यंदा 7.84 टक्यांची घट झाली आहे. संपूर्ण राज्यातच टक्केवारी घसरली असून पिंपरी-चिंचवड शहरही यात अपवाद ठरले नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
राज्यभरात दहावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्कंठा विद्यार्थ्यासह पालकांना लागली होती. शनिवारी दुपारी निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासून विद्यार्थी व पालकांनाही उत्सुकता होती. परीक्षेचा निकाल पाहून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. संकेतस्थळावर निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष करुन एकमेकांना पेढे वाटत शुभेच्छा देताना दिसले. शहरातील अनेक शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून अनेक शाळांनी निकालात नव्वदी पार केली आहे. तसेच, दहावीच्या निकालाची गुणपत्रके लवकरच शाळांमध्ये मिळणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील 187 शाळांमधून 19 हजार 176 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तसेच, पिंपरी शहर, खेड, मावळ आणि मुळशी, हवेलीतील सुमारे 512 शाळांचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातून एकूण 19 हजार पन्नास विद्यार्थी बसले होते. त्यात मुलांची संख्या 10186 तर मुलींची संख्या 8864 होते. या परीक्षेत अनुक्रमे मुले 8416 तर मुली 8061 उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यात मुलांची टक्केवारी 82.62 टक्के असून मुलींची 90.94 आहे. दरम्यान, विद्यार्थी-पालकांना दहावीच्या निकालाची उत्सुकता संपली असून ठरविलेल्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू होणार आहेत.
शंभर टक्के निकालात 31 शाळांची घट
पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, खेड, मुळशी व हवेली तालुक्यात अनेक शाळांची शंभर टक्के निकालाची परंपरा होती. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी 76 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. तर, यंदा 45 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामुळे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शंभर टक्के निकालांत 31 शाळांची घट झाल्याचे दिसून आले. परिणामी, निकाल घटल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात होती.
दहा शाळांचे निराशाजनक प्रदर्शन
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 187 शाळा असून त्यापैकी 45 शाळांनी शंभर टक्के यश मिळवले आहे. काही शाळांची मात्र निकालाच्या बाबतीत पडझड झालेली दिसून येत आहे. सुमारे दहा शाळांचा निकाल 50 टक्के किंवा त्याहून कमी लागला आहे. काही शाळांचा तर तीस ते चाळीस टक्के दरम्यान निकाल लागला आहे. तसेच महापालिकेच्या काही शाळांची यंदा निकालात वाईट अवस्था पहायला मिळाली आहे.