श्रीलंकेच्या युवकांचा भारतावर विजय

एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी

कोलंबो: शशिका दुलशान आणि नवीन फर्नांडो यांची भेदक गोलंदाजी आणि निपुण धनंजया व पसिंदु सूरियाबंदारा यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेच्या युवा संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय युवा संघाचा पाच गडी आणि 26 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे श्रीलंकेच्या युवकांनी या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव 47 षटकांत सर्वबाद 193 धावांवर गुंडाळला गेला. विजयासाठी 194 धावांचे आव्हान श्रीलंकेच्या संघाने 45.4 षटकांत 5 बाद 195 धावा फटकावून सहज पूर्ण करत मालिकेतील दुसरा सामना आपल्या नावे केला.

विजयासाठी 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचा पहिला गडी परनविथना केवळ 4 धावा करून तंबूत परतला तर नवीन फर्नांडो संघाच्या 46 धावा असताना परतल्याने श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला होता. निपुण धनंजय आणि नुवानिदू फर्नांडोने 40 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या 88 धावा झाल्या असताना फर्नांडो बाद झाला. त्यानंतर आलेल्या पसिंदू सूरियाबंदारा आणि कर्णधार निपुण धनंजय यांनी 20 षटकांत 92 धावांची भागीदारी करत संघाला विजयासमीप नेले.

विजयासाठी 14 धावा कमी असताना पसिंदू 52 धावा करून बाद झाला, तर त्याच्या जागी खेळायला आलेला सदुन मेंडिस हा लागलीच परतल्याने श्रीलंकेची छोटीशी घसरगुंडी झाली. मात्र निपुण धनंजयाने आणखीन गडी न गमावू देता संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. यावेळी धनंजयने 112 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 92 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचे पहिले दोन गडी केवळ 19 धावांत परतले, तर 79 धावांत भारताचे चार गडी तंबूत परतले होते. भारताचा सलामीवीर पवन शहाने (49) याने एक बाजू सांभाळत संघाची धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने आवश्‍यक प्रतिसाद मिळाला नाही. बहुतेक फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेल्याने भारताला केवळ 193 धावांचीच मजल मारता आली. यावेळी श्रीलंकेच्या शशिका दुलशानने 27 धावा देताना 3 गडी बाद केले तर नवीन फर्नांडोने 17 धावांत 2 गडी बाद करताना त्याला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक-
भारतीय युवक संघ – 47 षटकांत सर्वबाद 193 (पवन शहा 49, आयुश बदोनी 36, समीर चौधरी 32, देव गौड 24, शशिका दुलशान 27-3, नवीन फर्नांडो 17-2, परनविथना 27-2, मानसिंघे 39-2) पराभूत विरुद्ध श्रीलंका युवक संघ- 45.4 षटकांत 5 बाद 195 (निपुण धनंजया नाबाद 92, सूरियाबंदारा 52, देसाई 31-2, देव गौड 32-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)