पसरणी घाट बनलाय पार्ट्यांचा अड्डा

पाचगणीकडे जाणाऱ्या भाजीच्या गाड्या कचरा खाली करतायत घाटातच

वाई – काही दिवसांपूर्वी वनविभागाने पसरणी घाटात कचरा टाकणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही अशी कृत्य करणाराला वचक बसलेला नसून पसरणी घाटात रस्त्याच्या कडेला भाजी-पाल्याचा कचरा, पोल्ट्रीचा कचरा टाकून वाहन मालक पसार होत आहेत. घाटात फिरायला येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व प्रवासी करीत आहेत.

पसरणी घाटात अनेक ठिकाणी अशा प्रकारचा कचरा टाकून जणूकाही स्वयंघोषित कचरा डेपो बनविल्याचे चित्र सध्या याठिकाणी दिसत आहे. पाचगणी-महाबळेश्‍वरला जाणारे सर्वच पर्यटक पसरणी घाटातून जात असताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे राहिलेले अर्धवट पार्सल, दारूच्या बाटल्या संपल्या की, गाडीतूनच रस्त्याच्या कडेला टाकून जाण्याची प्रथाच या घाटात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात या घाटात अनेक ठिकाणी ओल्या-सुक्‍या पार्ट्या करण्याचे अड्डे तयार करण्यात आले आहेत. त्याठिकाणी मौज-मजा करायची आणि राहिलेले पदार्थ, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकून जातात. तो कचरा कमी की काय म्हणून सध्या भाजी-पाल्याचे ढीग पसरणी घाटात रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहेत.

वाई शहरात या पाचगणीत घराचे दुरुस्तीचे काम करतात आणि उरलेला कचरा सरळ पसरणी घाटात आणून टाकत आहेत. जैविक कचरासुध्दा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेला असतो. पाचगणी सारख्या शहरात मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये बाहेरून येणारे पर्यटक जंगी पार्ट्या करून उरलेले अन्न पदार्थ, ग्लास, पत्रावळ्या, मद्य पेयाच्या बाटल्या, सुध्दा घाटात अनेक ठिकाणी पडलेल्या असतात. त्या स्वच्छ करण्याचे काम वाई शहरातील फिरायला येणारे ग्रुप व काही सेवाभावी संघटना करीत असतात. स्वतःचे गाव स्वच्छ करण्याच्या नादात पाचगणी नगरपालिकेने पाचगणीत येणारे पर्यटक फिरण्याबरोबर घाण कुठे टाकतायत, हेही पाहणे गरजेचे आहे. पसरणी घाट स्वयंघोषित कचरा डेपो असल्यासारखा घाण करत असतात. यावर कुठेतरी पायबंद घालण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. तरी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होत असताना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वन विभागाने गस्त घालून पर्यावरणावर घाला घालणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)