पालिकेकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ

कोपरगावमध्ये स्वच्छ पाण्यात दूषित पाणी मिसळण्याचा अजब प्रकार उघडकीस
शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठा केला बंद
 

कोपरगाव – येसगाव येथील कोपरगाव पालिकेच्या साठवण तलाव क्रमांक दोनच्या शेजारील तलावात दूषित पाणी मिसळले जात असून ते पाणी कोपरगावकरांना पिण्यासाठी दिले जात असल्याचा अजब प्रकार शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी उघडकीस आला असून स्वच्छ पाण्याच्या तलावात येणारे दूषित पाणी तातडीने बंद करण्यात आले आहे. यावरून नगरसेवकांना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना चांगलेच धारेवर धरले होते.

येसगाव येथील कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक दोनच्या शेजारील तलावातून पाझरलेले दूषित पाणी पुन्हा तलावांमध्ये उचलून त्या स्वच्छ पाण्यात टाकण्याचे काम पालिका करत असल्याची चर्चा ऐकून नगरसेवकांनी थेट तलावच गाठला. स्वच्छ पाण्यामध्ये दूषित पाणी टाकून पालिका नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करीत असल्याची तक्रार भाजप शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

साठवण तलाव क्रमांक दोनच्या शेजारी पाझरलेल्या पाण्यामध्ये मोकाट जनावरे, कुत्रे बसल्याचे दिसून आले. जवळच्या काठणामध्ये मृत जनावरे पडले असून त्यामुळे त्या सडलेल्या जनावरांचे मांस खाऊन मोकाट कुत्रे ते पाणी पितात. पाझरलेले दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पालिकेचे काही कर्मचारी विद्युत मोटारच्या साह्याने पुन्हा ते पाणी दोन नंबर साठवण तलावाच्या स्वच्छ पाण्यामध्ये मिसळत असल्याचे निदर्शनात आल्याने कोपरगावमध्ये चर्चेला उधाण आले. पालिका प्रशासन कोपरगावकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार उघड झाल्याने सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नगरसेवकांनी साठवण तलावावरील दूषित पाणी उपसा करणारी विद्युत मोटारी, पाईप स्वतः काढून लिप्ट होणारे दूषित पाणी बंद करण्यात आले. पाण्यामधील मृत जनावरे काढून टाकल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

नगरसेवकांनी वहाडणे यांच्यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नगर-मनमाड महामार्गालगत पालिकेचे साठवण तलाव आहेत. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाजे म्हणाले, नगराध्यक्ष वहाडणेंना पालिकेच्या पाणी बचतीची इतकी काळजी असेल तर त्यांनी सर्वप्रथम शहरातील मुख्य लाईनवरील बेकायदेशीर नळ तोडावे.अशा दूषित पाण्याची बचत करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. तळ्यावर येऊन शो बाजी करून पाणी चोरी झाल्याचा खोटा आरोप केला. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी साठवण तलावावर पालिकेच्या पाण्याची चोरी झाली नसल्याचे सांगुन वहाडणेंचा आरोप खोटा असल्याचे सिद्ध केले.

पराग संधान म्हणाले. रमजान सारख्या पवित्र सणांमध्ये नागरिकांना असे दूषित पाणी देऊ नये, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तीन तांत्रिक कर्मचारी जलशुद्धीकरण्याच्या कामासाठी पालिकेला मोफत देण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांवर वहाडणे यांनी टीकाटिपणी करून बदनामी केली. जनतेला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. तरीही माणुसकीच्या भावनेतून यापूर्वीच्या पाणीटंचाईच्या काळामध्ये संजीवनी उद्योग समूहाने स्वखर्चाने शहरातील बोरअवेलच्या पाणी उपशासाठी 41 विद्युत मोटारी दिलेल्या होत्या. त्यापैकी सध्या चालू स्थितीत 18 आहेत. या सर्व मोटारींचा आजही खर्च संजीवनी उद्योग समूह करीत आहे अशी माहिती दिली.

दरम्यान,शहरासाठी 49 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नगराध्यक्ष वहाडणे यांनी त्वरित पूर्ण करून या योजनेच्या माध्यमातून शहरवासीयांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा, असे मत नगरसेवक जनार्दन कदम यांनी व्यक्त केले. नगरसेवक रवींद्र पाठक म्हणाले, नगराध्यक्षांनी नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर शहरावर ही वेळ आली नसती. यापूर्वी 21 दिवसाआड पाणीपुरवठा झाला, तेव्हा संजीवनी उद्योग समूहाने चाळीस पाण्याचे टॅंकर मोफत वाटून नागरिकांची तहान भागवली. 2012 पासून पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरती मोफत कर्मचारी ठेवले. पालिकेचे दर महिन्याला जलशुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च होतात.तो खर्च संजीवनी उद्योग समूहाने वाचवत. नागरिकांना स्वच्छ पाणी दिले. नगराध्यक्षांनी पाणी बचतीच्या नावाखाली दूषित पाणी शुद्ध पाण्यात मिसळून नागरिकांच्या जीवाशी खेळू नये.

साठवण तलाव परिसरातील दुर्गंधीयुक्त पाण्याची पाहणी करीत भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्या परिसरात काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन पुन्हा दूषित पाणी होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, नगरसेवक स्वप्निल निखाडे, शिवाजी खांडेकर, जनार्दन कदम, पराग संधान, विवेक सोनवणे, दिनेश कांबळे, आरिफ कुरेशी, बाळासाहेब आढाव आदी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)