क्रीडांगण : विराटचा दिवाळी धमाका (भाग 1)

-नितीन कुलकर्णी

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सुपरफॉर्ममध्ये असताना तो कोणकोणते विक्रम रचेल याची चर्चा नसायची; चर्चा असायची सचिननंतर कोण? अनेक दिवस या प्रश्‍नाचे उत्तर क्रिकेटमधील चाहते आणि समीक्षक शोधत राहिले, पण आता हे उत्तर स्पष्टपणाने मिळाले आहे. ते आहे विराट कोहली. नावाप्रमाणेच कामगिरी करणाऱ्या या धडाकेबाज खेळाडूने अलीकडेच सर्वांत कमी डावात दहा हजार धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित करून नवा इतिहास रचला आहे. आगामी काळातही त्याची ही विक्रमांची परंपरा अशीच अव्याहतपणानं सुरू राहील हे निर्विवाद आहे.

दहा वर्षांपूर्वी दाम्बूला येथे वीस वर्षांच्या विराट कोहलीने भारताकडून जेव्हा पहिला एकदिवसीय सामना खेळला तेव्हा पुढील दहा वर्षांत तो दहा हजार धावा करेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. दिल्लीत जन्मलेला विराट हा एकामागून एक विक्रम प्रस्थापित करेल, याची सूतराम कल्पनाही कोणी केली नव्हती.

इतकेच नाही तर मास्टरब्लास्टर सचिनलाही विराटच्या विक्रमाची भणक लागली नाही. अशा विराटने सचिनचा दहा हजार धावांचा विक्रम मोडला. गेल्या काही वर्षात माध्यमांत सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या विराटने भारताला विजय मिळवून देण्यातही कसूर ठेवलेली नाही, हे विशेष. सौरभ, धोनीच्या परंपरेतील कर्णधार असलेल्या विराटकडून आणखी किती विक्रम होतात, याची उत्सुकता चाहत्यांना लागली नसेल तर नवलचं.

वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टण येथे खेळताना विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. कमीत कमी डावात दहा हजार धावा करण्याचा पराक्रम त्याने केला आहे. या सामन्याच्या अगोदर विराटच्या नावावर 212 सामन्यात 204 डावात 9919 धावा होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 37 व्या षटकात ऍश्‍ले नर्सच्या चेंडूवर विक्रम प्रस्थापित केला. कोहलीने 205 डावातच दहा हजार धावा केल्या. सचिनने दहा हजार धावांचा पल्ला 31 मार्च 2001 रोजी गाठला होता. या धावा त्याने 259 डावात केल्या होत्या. एका अर्थाने विराटने सचिनपेक्षा 54 डाव कमी खेळले आहेत. सर्वात कमी डावात दहा हजार धावा करण्यात दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा नंबर लागतो.

18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध पर्दापण करून एकदिवसीय सामन्यांचे करियर सुरू करणाऱ्या कोहलीने जानेवारी 2017 मध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली. एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विचार केल्यास हा विक्रम साहजिकच सचिनच्या नावावर आहे. त्याने 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा 14234, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग 13704, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या 13430, महिला जयवर्धने 12650 आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक 11739 यांचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांत सचिननंतर गांगुलीचा क्रमांक लागतो. त्याने 11 हजार 363 धावा तर द्रविडने 10889 धावा केल्या आहेत. धोनीने 10123 धावा केल्या. सचिनपेक्षा कमी डावात दहा हजार धावा करणाऱ्या विराटने 37 शतकांची नोंद केली आहे. अर्थात त्याचे दोन शतक तर वेस्ट इंडिजविरुद्दच्या पहिल्या दोन्ही सामन्यात आहेत. कसोटीचा विचार केल्यास विराटने 2011 मध्ये खेळण्यास सुरुवात केली. गेल्या 7 वर्षात 73 सामने आणि 124 डाव खेळत 6334 धावा केल्या आहेत. त्यात 24 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. ज्या वेगाने तो धावांचा पाऊस पाडत आहे, ते पाहता येत्या काही वर्षात तो सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रमही सहज मागे टाकेल, असे वाटत आहे.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील शतकांची गोळाबेरीज केली तर ती संख्या 61 होते. सचिनची बरोबरी करण्यासाठी आता 39 शतकांची गरज आहे. अर्थात त्याची धावगती अशीच राहील तर हा विक्रमही तो मोडू शकतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विराटचे करिअर बहरले आहे. त्याने तिन्ही श्रेणीत कर्णधारपद सांभाळल्याने त्याला कधीही मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. सामना कोठेही असो मग तो भारतात किंवा भारताबाहेर असो त्याची फलंदाजी प्रत्येक हंगामात बहरली आहे. मात्र, गेल्या इंग्लंडच्या दौऱ्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत, असे अनेक जण म्हणत आहेत. म्हणूनच आगामी काळात त्याची बॅट तळपणार की नाही, हे काळच सांगेल.

क्रीडांगण : विराटचा दिवाळी धमाका (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)