क्रीडांगण : विराटचा दिवाळी धमाका (भाग 2)

-नितीन कुलकर्णी

क्रीडांगण : विराटचा दिवाळी धमाका (भाग 1)

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सुपरफॉर्ममध्ये असताना तो कोणकोणते विक्रम रचेल याची चर्चा नसायची; चर्चा असायची सचिननंतर कोण? अनेक दिवस या प्रश्‍नाचे उत्तर क्रिकेटमधील चाहते आणि समीक्षक शोधत राहिले, पण आता हे उत्तर स्पष्टपणाने मिळाले आहे. ते आहे विराट कोहली. नावाप्रमाणेच कामगिरी करणाऱ्या या धडाकेबाज खेळाडूने अलीकडेच सर्वांत कमी डावात दहा हजार धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित करून नवा इतिहास रचला आहे. आगामी काळातही त्याची ही विक्रमांची परंपरा अशीच अव्याहतपणानं सुरू राहील हे निर्विवाद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विराटच्या बॅडपॅचचा विचार केल्यास आपल्याला चार वर्षे मागे जावे लागेल. परंतु आता त्याने आपल्या खेळीत संपूर्ण बदल केला आहे. सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांनी कर्णधारपदाच्या नात्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला, मात्र विराटने संघाच्या विजयात आणखीच “चार चॉंद’ लावले. तसे पाहिले तर यावर्षीच्या इंग्लंड दौऱ्यात भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. वास्तविक भारतीय उपखंडातील देशांना इंग्लंडच्या वातावरणाचा नेहमीच फटका बसला आहे आणि आव्हानही राहिले आहे. याचा परिणाम विराटच्या फलंदाजीवरही झाला आहे.

उर्वरित ठिकाणी विराटची फलंदाजी सतत बहरत राहिली आहे. तेंडुलकर आणि धोनीनंतर विराटची ब्रॅंड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. आंतराष्ट्रीय सामन्याचा विचार केल्यास त्याचा प्रवास दहा वर्षाचाच झाला आहे. पाच नोव्हेंबरला तो 30 वर्षांचा होईल. त्याचा फिटनेस पाहता तो आणखी सात-आठ वर्षे खेळेल, असे वाटत आहे. त्याची बॅट अशीच तळपत राहिली तर तो किती शतकं आणि धावा काढेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. विराटच्या फलंदाजीची एक खासियत आहे, ती म्हणजे तो केवळ धावा काढत नाही तर एकामागून एक विक्रमाची नोंद करत जातो.

दहा हजार धावा काढणाऱ्यांत त्याची सरासरी 59.62 ही सर्वोत्तम मानली जाते. त्यापैकी 6 हजार धावा या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना काढल्या आहेत. त्याच्यापुढे सचिन (8720 धावा) आहे. यावर्षी विराटने 11 डावात 149.42 च्या सरासरीने 1046 धावा काढल्या. त्यात पाच शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने वयाच्या 29 वर्ष 353 दिवसात दहा हजार धावांचा विक्रम केला. सचिनने हा विक्रम 27 वर्ष 34 दिवसात केला होता. विराटचा स्ट्राइक रेट हा 92.85 इतका आहे. त्यानंतर सनथ जयसूर्याचा क्रमांक लागतो. त्याची सरासरी 88.52 इतकी आहे. दहा हजार धावा काढणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीने केवळ धावाच काढल्या नाही तर संघाला विजयही मिळवून दिला आहे.

दहा हजारपैकी 7 हजार धावा या विजयाच्या रूपातून निघाल्या आहेत. विजयात त्याच्या धावांची टक्केवारी 78 तर पराभावत 36 इतकी आहे. एक हजारापेक्षा अधिक धावा त्याने सहा देशांविरुद्ध काढल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध 2186, विंडिजविरुद्ध 1684, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1269, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1182, न्यूझीलंडविरुद्ध 1154 आणि इंग्लंडविरुद्ध 1112 धावांची बरसात केली आहे. विराट कोहली हा गोलंदाजासाठी नेहमीच कर्दनकाळ राहिला आहे. एकदिवसीय सामन्यात कोहलीने सर्वाधिक धुलाई श्रीलंकेच्या थिसारा परेराची करत 262 धावा केल्या आहेत. त्यानंतर लसिथ मलिंगाचा क्रमांक लागतो. मलिंगाच्या चेंडूवर भारतीय कर्णधाराने 236 धावा काढल्या. त्यानंतर नुवान कुलसेकराविरुद्ध 202, एंजेलो मॅथ्यूजविरुद्ध 196 धावा, इमरान ताहिरच्या चेंडूवर 194 धावा आणि सौदीच्या विरुद्ध 187 धावा काढल्या आहेत.

विराटच्या धावांबरोबर फिटनेसबाबतही नेहमीच चर्चा होते. दहा वर्षात दहा हजार धावा करण्याची किमया त्याने फिटनेसच्या जोरावर केली, हे सांगायला नको. विराट हा वेगन डायटवर आहे, हे वाचून आश्‍चर्य वाटेल. गेल्या चार महिन्यात त्याने ऍनिमल प्रोटिन घेणे बंद केले आहे. म्हणजे विराटने सध्या मांसाहार आणि अंडे खाणे बंद केले आहे. गाय, म्हैस किंवा बकरीचे दूध देखील घेत नाही.

दुधापासून तयार होणारे पनीर, चीज, दही आणि आईस्क्रीमही वर्ज्य केले आहे. यावरून वेगन डायटबाबत उत्सुकता झाली असेल. वेगन डायट म्हणजे डाळ, शेंगदाणे, फळे, गहू आदीच्या माध्यमातून प्रोटिनची पूर्तता केली जात आहे. याशिवाय हिरवेगार पालेभाज्या स्प्राऊटस्‌, निश्‍चित तापमानावर शिजवलेल्या भाज्या खाणे याचा समावेश आहे. अशा आहाराने पचनशक्ती आणखीच वाढते, असे म्हटले जाते. विराटने संतुलित आहाराच्या जोरावर कमी कालावधीत विक्रम केला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)