पॅरिस – महिलांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सिमोना हालेपचे प्रशिक्षक डॅरेन केहिल यांनी शुक्रवारी घोषणा करताना सांगितले आहे की आपन 2019च्या सुरुवाती पासून हालेपचे प्रशिक्षक नसणार असून यामागे कोणतेही तात्विक वाद नसून कौटुंबीक कारण असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
केहिलयांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याची घोषणा केली असून यात त्यांनी लिहिले आहे की, मी आणि सिमोना हालेप आम्ही मागिल चार वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत होतो. मात्र, आगामी वर्षापासून आम्ही सोबत काम करणार नाहीत. या मागे माझे वैयक्तिक तसेच कौटुंबिक कारण असून आमच्यामध्ये कोणतेही तात्विक वाद नाहीत. मी सिमोना सोबतच्या मागील चार वर्षांमधील सर्वोत्तम काळासाठी सदैव ऋणी असणार आहे. तिचा समजूतदारपणा, नविन गोष्टी शिकण्याची वृत्ती, खेळावरील मेहनत आणि खेळातील व्यावसायिकपणा या सर्व बाबींमुळे तिला मार्गदर्शन केल्याचा मला आनंद असून तिचे प्रशिक्षण करणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सिमोना हालपने देखील आपल्या प्रशिक्षकांच्या कामाचा आदर करत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट केले असून. त्यात तिने लिहले आहे की, तुम्ही माझे प्रशिक्षक होतात त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. तुम्ही मागील चार वर्षांमध्ये माझ्यासाठी केलेल्या मेहनतीसाठी मी तुमचे आभार मानते.
ऑस्ट्रेलियाचे डॅरेन केहील हे मागील चार वर्षांपासून हालेपचे प्रशिक्षक होते. त्यांनी याच वर्षी जून महिन्यात हालेपला रोलॅंड गॅरोस फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या हालेपचे हे एकमेव ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे. 52 वर्षीय केहील यांनी लेयटॉन हेवीट आणि आंद्रे अगासी या महान खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा