वीर चत्रानी, सुनीता पटेल यांनी उद्‌घाटनाचा दिवस गाजवला

पुणे – महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिने तर, पुरुष गटात वीर चत्रानी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्‍लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चत्रानी याने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित ऐश्‍वर्य सिंगचा 9-11, 11-5, 10-12, 11-3,11-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
महिला गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सुनीता पटेल हिने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या राधिका राठोरचा 11-5,12-10, 9-11, 11-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सानिका चौधरी हिने आपलीच राज्य सहकारी दिया मुलाणीचा 13-11,11-6, 11-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाने महाराष्ट्राच्या योश्‍ना सिंगला 11-9, 11-3, 12-10 असे पराभूत करून आगेकूच केली.

पुरुष 45वर्षावरील गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या विनय रौथन,आशुतोष पेडणेकर, कर्नाटकाच्या अनुप कबडवाल, नवीन शेनॉय यांनी तर, प्रो कोच गटात महाराष्ट्राच्या महेश कदम, जयनेंद्र भंडारी, सर्व्हिसेसच्या जय सिंग थोरी, उत्तरप्रदेशच्या शादाब आलम,राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचे उदघाटन संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, कैलाश कोद्रे, जहांगीर हॉस्पिटलचे सर कावसजी जहांगीर आणि लेडी जास्मिन जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसआरएचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीडीएसएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी, पवन राऊत, गणेश तांबे, आनंद सुरोडकर, ज्ञानेश भावसार, डॉ. संदीप जगताप, डॉ. आकाश शहा, मरीशा जिल्का आणि आसिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)