पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धा
पुणे – पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने केडन्स संघाचा 81 धावांनी तर, दुसऱ्या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 114 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 37.3 षटकांत 184 धावा केल्या. केडन्स संघाने 40 षटकांत 9 बाद 261 धावा केल्या. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने केडन्सची अंतिम धावसंख्या 216(वजा 45धावा)झाली व केडन्सने पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली. पीवायसीकडून यश मानेने 70 धावात 5 गडी बाद केले. दुसऱ्या डावात पीवायसी संघाने 20 षटकात 8 बाद 186 धावा केल्या.
पीवायसीचे 8 गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या 146 धावा(वजा 40 धावा) झाली. यात दिव्यांग हिंगणेकरने 49 चेंडूत 42 धावा व मंदार भंडारीने 18 चेंडूत 32 धावा केल्या. त्यानंतर प्रीतम पाटील 39 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. केडन्सकडून इझान सय्यदने सुरेख गोलंदाजी केली. केडन्सला विजयासाठी निर्धारित षटकांत 115 धावांचे आव्हान होते. मात्र, केडन्सला 17.2 षटकांत 83 धावाच करता आल्या. केडन्सचे 10 गडी बाद झाल्याने त्यांची धावसंख्या 33(वजा 50 धावा) झाली. यावेळी पीवायसीकडून योगेश चव्हाण(15-3), अमेय भावे(6-2), रोहन दामले(12-2), दिव्यांग हिंगणेकर(13-1), साहिल छुरी(28-1)यांनी भेदक गोलंदाजी करत संघाला 81 धावांनी एकहाती विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 40 षटकांत 9 बाद 213 धावा केल्या. तत्पूर्वी काल डेक्कन जिमखाना संघ 22.5 षटकांत 5 बाद 160 अशा स्थितीत होता. यात अभिषेक ताटे 41, स्वप्निल फुलपगारे 34 यांनी धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर शुभम नागवडेच्या 36 धावा, शुभांकर हार्डीकरच्या 34 धावा वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. व्हेरॉककडून विशाल गीते (34-3), शुभम तैस्वाल (42-3), राहुल वारे (28-1), ऍलन रॉड्रिगेस (44-2)यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत डेक्कन संघाला 222 धावांवर रोखले. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 177 (वजा 45) झाली. त्यामुळे व्हेरॉक संघाने पहिल्या डावात 36 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने 20षटकात 3बाद 187 धावा केल्या. व्हेरॉकचे 3 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 172धावा(वजा15)झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी करत 46 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 74 धावांची खेळी केली. डेक्कन जिमखाना संघाला 20 षटकात विजयासाठी 209 धावांचे आव्हान होते. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाला 20 षटकांत 9 बाद 129 धावांच करता आल्या.