मृणाल, अमोद, निशिता, रितिका, सिमरन यांचे सनसनाटी विजय

पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धा

पुणे -पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत मृणाल शेळके, अमोद सबनीस, निशिता देसाई, रितिका मोरे, सिमरन छेत्री या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळविला.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित मृणाल शेळके हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित दुर्गा बिराजदारचा 6-2 असा सहज पराभव केला. आठव्या मानांकित रितिका मोरे हिने चौथ्या मानांकित अंजली निंबाळकरचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सातव्या मानांकित निशिता देसाई हिने दुसऱ्या मानांकित गायत्री मिश्रावर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला.

14 वर्षांखालील मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित अमोद सबनीस याने अव्वल मानांकित अर्णव ओरुगंतीचा 6-3 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. तिसऱ्या मानांकित पार्थ देवरूखकरने सोहम अमुंडकरचा 6-4, तर सातव्या मानांकित हर्ष ठक्कर याने बाराव्या मानांकित ऐत्रेया रावचा 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)