अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र पराभूत,हरियाणाचा सलग दुसरा विजय

औरंगाबाद – गतवर्षी उपविजेता राहिलेल्या हरियाणा संघाने येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरा विजय साकारत अतापर्यंतच्या स्पर्धेत अजिंक्‍य राहण्याची किमया साधली आहे. महाराष्ट्राला मात्र सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली असून, अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राविरुद्ध गंगपूर ओडिशा संघाने विजय मिळवला. हरियाणाने झारखंडला 3-2 ने नमवत ब गटातील अव्वलस्थान कायम ठेवले. दुसरीकडे क गटात सलग दुसरा पराभव पत्करावा लागलेल्या महाराष्ट्र संघाला गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

हरियाणा, झारखंड दरम्यानच्या सामन्यात अंकुशने (4 मि. 36 मि.) दोन गोल केले आणि हरियाणा संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत 1-0 असलेली ही आघाडी कालांतराने 2-0 पर्यंत गेली. तिसऱ्या सत्रात मात्र झारखंडने काहीसा पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश आले ज्यात अनुरुद भेंगरा (42 मि.) याने पेन्ल्टी कॉर्नरचा मोका साधला. त्यापुढे राजू होरोने 45 व्या मिनिटात पेनल्टी स्ट्रोकच्या माध्यमातून गोलसंख्येत 2-2 ची बरोबरी केली. परमितने 52 व्या मिनिटात गोल केला आणि सामना हरियाणाच्या बाजुने झुकवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर क गटातील सामन्यात यजमान महाराष्ट्र संघाला सलग दुसरा पराभव चाखावा लागला. त्यांना गंगपूर ओडिशाने 2-1 च्या फरकाने नमवले. मध्यंतरापर्यंत व्यंकटेश केचे (28 मि.) च्या 1-0 ची असलेली आघाडी महाराष्ट्राला कायम ठेवता आली नाही. अमरदीप लाक्रा या ओडिशाच्या खेळाडूने 36 व्या मिनिटांत बरोबरी साधली आणि सामन्याला वेगळा रंग दिला. ग्रेगोरी झेसने (51 मि.) लगावलेल्या दमदार फटक्‍याने बाजी फिरली आणि सामना हॉकी गंगपूर ओडिसाच्या पारड्यात गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)