पुणे – केपजेमिनी आणि मास्टरकार्ड संघांनी प्रथम स्पोर्टस् आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर शनिवारी या लढती झाल्या.
यातील पहिल्या लढतीत केपजेमिनी संघाने सिंक्रॉन संघावर 9 गडी राखून सहज मात केली. सिंक्रॉन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 149 धावा केल्या. यात संजयसिंगने 33 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. केपजेमिनी संघाने विजयी लक्ष्य एक गडीच्या मोबदल्यात 15.5 षटकांतच पूर्ण केले. यात गिरीश बोरा आणि विक्रांत बांगर यांनी 101 धावांची सलामी दिली. गिरीशने 42 चेंडूंत 10 चौकारांसह 57, तर विक्रांतने 38 चेंडूंत 10 चौकारांसह 56 धावा केल्या.
दुसऱ्या लढतीत मास्टरकार्ड संघाने एमफेसिस संघावर सात गडी राखून मात केली. यात एमफेसिस संघाला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 139 धावाच करता आल्या. मास्टरकार्ड संघाने विजयी लक्ष्य प्रत्युष साहूच्या अर्धशतकाच्या जोरावर 19.2 षटकांत 3 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. प्रत्युषने 33 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 55 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – 1) सिंक्रॉन – 20 षटकांत 5 बाद 149 (संजयसिंग 48, कार्तिक हिरपारा 38, सौरभसिंग 24, फनिंद्र पैला 2-23, संजयकुमार 1-20, विक्रांत बांगर 1-24) पराभूत वि. केपजेमिनी -15.5 षटकांत 1 बाद 151 (गिरीश बोरा 57, विक्रांत बांगर नाबाद 56, साकेत देशपांडे नाबाद 15, कार्तिक हिरपारा 1-23).
2) एमफेसिस – 20 षटकांत 6 बाद 139 (संतोषकुमार सांगळे 29, शरथ रेड्डी 21, रुपेश कुडले नाबाद 21, रिझवान खान 18, अमित भगत 2-17, मंदार एन. 1-35, इशान शिंदे 1-27, आशिष भोसले 1-32) पराभूत वि. मास्टरकार्ड – 19.2 षटकांत 3 बाद 142 (प्रत्युष साहू नाबाद 55, रितूसुंदन गुजर 43, रिझवान खान 1-22).
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा