वेस्ट इंडीजवर भारताचा एक डाव 272 धावांनी दणदणीत विजय

पदार्पणवीर पृथ्वी शॉला सामनावीराचा पुरस्कार

भारताचा घरच्या मैदानावरील हा शंभरावा विजय

भारताचा घरच्या मैदानावरील हा शंभरावा विजय ठरला. 1933 ते 2018 या कालावधीत भारताने मायदेशात 266 सामने खेळले आणि त्यात 100 विजयांची नोंद केली. वेस्ट इंडीजविरुद्ध भारताने विजयाचे शतक झळकावले. 52 सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला, तर एक सामना अनिर्णीत सुटला. वेस्ट इंडीजवर एक डाव आणि 272 धावांनी मिळवलेला हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी भारताने अफगाणिस्तानला एक डाव व 262 धावांनी पराभूत केले होते. वेस्ट इंडीजला भारताने घरच्या मैदानावर पाचव्यांदा डावाने पराभूत केले आहे.

राजकोट – वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असून सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताने पाहुण्यांचा दुसरा डाव 196 धावात गुंडाळला आणि एक डाव 272 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉला त्याच्या धडाकेबाज शतकी खेळी मुळे सामनावीराच्या पुरस्काराणे गौरविण्यात आले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 649 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करता करता विंडीजची दुसऱ्या दिवसाअखेर 6 बाद 94 अशी दुरावस्था झाली. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होता काही तासांतच वेस्ट इंडीजचा सगळा संघ 181 वर बाद झाला. भारतीय संघाने विंडीजला फॉलो ऑन देत पुन्हा फलंदाजीची संधी दिली. पण याही डावात तिसरा दिवस संपण्याच्या आधीच भारताच्या गोलंदाजांनी विंडीजच्या संपूर्ण संघाला 196 वर बाद केले. 272 धावांची आघाडी आणि एका डावासह हा विक्रमी विजय भारताने वेस्ट इंडीजवर मिळवला आहे.

या सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव केवळ 181 धावात संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात केलल्या 649 धावांच्या डोंगरापुढे वेस्ट इंडीजला निम्मी धावसंख्या ही उभा करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फॉलऑनची नामुष्की आली होती. तर दुसऱ्या डावातही विंडीजच्या खेळाडूंना जास्त चमक दाखवता आली नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, मात्र रविचंद्रन अश्‍विनने क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत विंडीजला पहिला धक्का दिला.

तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत विंडीजने एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांपर्यंत मजल मारली, मात्र उपहारानंतर विंडीजचा डाव पुन्हा एकदा गडगडला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विंडीजचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. कायरन पॉवेल आणि शाई होप यांच्यात झालेली 47 धावांची भागीदारी आणि मधल्या फळीत रोस्टन चेसने पॉवेलला दिलेली साथ या जोरावर वेस्ट इंडीजचे 150 धावांचा टप्पा ओलांडला. पॉवेलने भारतीय फिरकीपटूंवर चांगला हल्लाबोल करत अर्धशतक झळकावलं. मात्र 83 धावांवर त्याला कुलदीपच्या गोलंदाजीवर माघारी परतावं लागलं. यानंतर विंडीजचे उरलेले सर्व फलंदाज हे हजेरीवीर ठरले.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा वेस्ट इंडीजने कालच्या 6 बाद 94 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मैदानात असलेल्या किमो पॉल आणि रोस्टन चेज यांनी थोडी आक्रमक सुरुवात केली. पण उमेश यादवने पॉलला 47 धावांवर बाद करत वेस्ट इंडीजला सातवा धक्का दिला. त्यानंतर चेजने अर्धशतक पूर्ण केले. पण अश्‍विनने त्याला माघारी पाठवले. त्याच षटकात अश्‍विनने वेस्ट इंडीजला आणखी एक धक्का दिला. वेस्ट इंडीजची अखेरची विकेट देखील अश्विनने घेत त्यांचा डाव 181 धावांवर संपुष्ठात आणला. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 468 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताकडून अश्‍विनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मोहम्मद शमीने 2 तर उमेश यादव, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. यावेळी रोस्टन चेस ( 53) आणि मिमो पॉल ( 47) वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजाला भारताच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही.

त्यापुर्वी काल भारताच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ आपल्या पहिल्या डावात पुरता कोलमडलेला दिसून आला. विंडीजचा निम्मा संघ शंभरीच्या आतच माघारी परतला होता. मोहम्मद शमीने सलामीच्या दोन्ही फलंदाजाना माघारी धाडत विंडीजला धक्के दिले. यानंतर रविचंद्रन आश्‍विन, रविंद्र जडेजा यांनी 1-1 बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक धक्का दिला. अखेर रोस्टन चेस आणि किमो पॉल यांनी अखेरची काही षटकं खेळून काढत संघाची पडझड थांबवली. दुसऱ्या दिवसाअखेरीस वेस्ट इंडीजने 6 गड्यांच्या मोबदल्यात 94 धावांपर्यंत मजल मारली होती.
तत्पूर्वी, फलंदाजांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव 9 बाद 649 धावांवर घोषित केला. सामन्यात पदार्पणवीर पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जडेजा यांनी केलेल्या शतकी खेळी आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजसामोर 650 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

पदार्पणवीर पृथ्वी शॉने खणखणीत शतक ठोकत वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीचे 24 वे कसोटी शतक तर ऋषभ पंतनेही कसोटी क्रिकेट मधील आपले पहिले अर्धशतक केले. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात पंत 92 धावांवर बाद झाला आणि त्याला शतकाने हुलकावणी दिली. यानंतर अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जडेजाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात 649 धावांपर्यंत मजल मारली. रवींद्र जडेजाने तळातल्या फलंदाजांना सोबतीला घेऊन कसोटी क्रिकेटमधिल आपले पहिले शतक साजरे केले. जडेजाने शतक झळकावल्यानंतर लागलीच विराट कोहलीने भारताचा पहिला डाव घोषित केला. जाडेजाने नाबाद 100 धावांच्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव 149.5 षटकांत 9 बाद 649 घोषित (विराट कोहली 139, पृथ्वी शॉ 134, रविंद्र जडेजा नाबाद 100, ऋषभ पंत 92, देवेंद्र बिशू 217-4), वेस्ट इंडीज पहिला डाव 48 षटकांत सर्वबाद 181 (रोस्टॉन चेस 53, किमो पॉल 47, रविचंद्रन अश्‍विन 37-4, मोहम्मद शमी 22-2). वेस्ट इंडीज दुसरा डाव 50.5 षटकांत सर्वबाद 196 (कायरन पॉवेल 83, रोस्टॉन चेस 20, कुलदीप यादव 57-5, रविंद्र जडेजा 35-3).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)