भारताने उडवला थायलंडचा धुव्वा

एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 

अबूधाबी : सुनील छेत्रीचे दोन गोल आणि नवोदित खेळाडू अनिरुद्ध थापा आणि जेजे लालपेकलुआ यांच्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने थायलंडचा 4-1 असा पराभव करत स्पर्धेतील अभियानाची सुरुवात विजयाने करत 3 गुण मिलवून अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. भारतासाठी सुनील छेत्रीने 27 आणि 46 मिनिटांना, थापाने 68 व्या मिनिटाला तर जेजेने 80व्या मिनिटला गोल नोंदवले. तर थायलंडसाठी एकमेव गोल तेरासील डांगडा याने केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या सत्राची सुरुवात दोन्ही संघांनी सावध केली. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक चाली रचण्यावर भर दिला. त्यामुळे सामन्याला गती मिळाली. परंतु, चेंडूवर ताबा मिळवण्यात भारतीय संघाला पुरेसे यश मिळाले नाही. 26 व्या मिनिटाला थायलंडच्या खेळाडूने स्वतःच्याच डी मध्ये चेंडू चुकीच्या पद्धतीने हातळल्याने भारतीय संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्याचा फायदा घेत छेत्रीने गोल नोंदवत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. पण भारतीय संघाचा आनंद फार काळ टिकला नाही. 33व्या मिनिटला थायलंडच्या तेरासीलने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पहिल्या सत्रात 45 मिनिटांचा खेळ झाला तेव्हा सामना 1-1 असा बरोबरीत होता.

दुसऱ्या सत्राची सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली. 46 व्या मिनिटला अनिरुद्ध थापाने आक्रमक चाल रचली आणि त्यावर गोल करत सुनील छेत्रीने भारतीय संघाची आघाडी 2-1 अशी वाढवली. त्यानंतर भारतीय संघाने आपली आक्रमणे वाढवली तर थायलंड संघांनेही बरोबरी करण्यासाठी प्रयत्न चालू केले. परंतु, त्याचा फायदा घेत प्रतिआक्रमणात नवोदित खेळाडू अनिरुद्ध थापाने 68 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. 78व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून जेजे मैदानात दाखल झाला. त्यानंतर थायलंडच्या बचावपटूने केलेल्या चुकीचा फायदा घेत जेजेने 80व्या मिनिटाला गोल केला आणि भारताची आघाडी 4-1 केली. त्यानंतर सामन्यात आणखी गोल होऊ शकला नाही आणि भारताने सामना 4-1 अशा फरकाने जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)