विंडीज विरुद्धच्या मालिकेतून खलील आणि रायुडू गवसले : विराट कोहली

थिरुवनंतपूरम – भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या अंतीम सामन्यात विंडीजचा 9 गडी राखून पराभव करताना पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-1 अशी जिंकली. या मालिकेचे फलीत म्हणजे बर्याच काळा पासून अपयशी होत असलेल्या मधल्या फळीतील फलंदाज आणि ठरावीक ठिकाणी आवश्‍यक असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज या मालिकेतून भारतीय संघाला अंबाती रायुडू आणि खलील अहमद यांच्या रुपाने गवसले आहेत. असे विधान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सामना संपल्यानंतर केले आहे.

भारतीय संघातील गोलंदाजांसाठी विंडीज विरुद्धची मालिका अनपेक्षीतपणे बरीच कसोटीची ठरली असली तरी पहिले दोन सामने वगळता इतर सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत विंडीजच्या फलंदाजांना रोखण्याचे काम केले. ज्यामध्ये भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी मोलाची कामगिरी केली. मात्र, पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती दिलेल्या बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमार पेक्षाही जास्त चर्चा झाली ती भारतीय संघाचा नवोदित डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदची.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खलीलेने या मालिकेत चार सामन्यांमध्ये 7 बळी मिळवताना वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत आपल्यातील चुणूक दाखवून दिली आहे. त्याची गोलंदाजी पहिल्या सामन्यात बरीच महागडी ठरली तर त्याला या सामन्यात केवळ एक गडी बाद करता आला. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला भारतीय संघातील सध्याचे सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमारच्या साथीत तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली. या सामन्यातही त्याने एक गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी नोंदवली.

तर, चौथ्या सामन्यात खलीलने आपल्या भेदक गोलंदाजीत केवळ 13 धावांमध्ये विंडीजच्या तब्बल तीन फलंदाजांना माघारी धाडत विजयात मोलाचा वाटा उचलतानाच सर्वांना त्याची दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे त्याच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. त्याच दृष्टीने बोलताना भारतीय संघाचा कर्नधार कोहली म्हणाला की, विश्‍वचषक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यात डावखुऱ्या गोलंदाजाची भारतीय संघाला गरज पडणार आहे त्या दृष्टीनेच खलीलची आशिया चषक आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली होती. या दोन्ही मालिकांमध्ये खलीलने आपल्या कामगिरीतून सर्वांना त्याच्यामधिल प्रतिभा दाखवून दिली आहे.

तर, खलीलच्या कामगिरी विषयी बोलताना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, खलीलला सध्या अनुभवाची कमी आहे. मात्र, जसा जसा त्याला अनुभव येत राहिल तशी तशी त्याच्या गोलंदाजीत धार वाढत जाईल. तो चांगला गोलंदाज आहे मात्र त्याला आपल्या गोलंदाजीचा वेग वाढवावा लागेल जेणे करुन त्याची गोलंदाजी आणखीनच भेदक होईल. असेही शास्त्री यांनी यावेळी सांगितले.

तसेच या मालिकेतून भारतीय संघाच्या फलंदाजीतील सर्वात मोठी चिंता नाहिशी झाली असून अंबाती रायुडूच्या रुपाने भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर चांगला आणि उपयुक्त फलंदाज गवसला आहे. गेल्या अनेक मालिकांपासून भारतीय संघ चौथ्या स्थानावरील फलंदाजाच्या शोधात होता. विंडीज विरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघाचा हा शोध संपल्यात जमा झाला आहे. कारण आता पर्यंत भारतीय संघाने चौथ्या स्थानासाठी तब्बल 11 फलंदाजांची चाचपणी केली असून त्या स्थानी जवळपास सर्वच फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत.

मात्र चालू मालिकेत रायुडूने चौथ्या स्थानावर चांगली फलंदाजी तर केलीच. मात्र त्याच बरोबर त्याने मोक्‍याच्फ्या क्षणी आपल्या फलंदाजीतील धार वाढवतानाच सहकारी फलंदाजांसोबत भागिदारीही केली. त्यामुळे रायुडू चौथ्या स्थानासाठी उपयुक्त फलंदाज असल्याचेही यावेळी कोहलीने सांगितले.

तर रवी शास्त्री यावेळी म्हणाले की, रायुडूने या मालिकेत ज्या पद्धतीने दडपणाचा सामना केला ते खरच कौतुकास्पद आहे. बऱ्याच वर्षांनी भारतीय संघात प्रवेश करणे आणि यश मिळविणे हे सोपे नाही. पुनरागमनाचे दडपण हे प्रत्येक खेळाडूवर असते दडपणाखाली तुमची कामगिरी खराब होऊ शकते पण रायुडूने हे दडपण व्यवस्थित हाताळले. त्यातूनच त्याची प्रतिभा दिसून येते असेही शास्त्री यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)