ISL 2018 : कर्णधार छेत्रीच्या गोलमुळे बंगळुरूची गोव्यावर मात

गोवा – हिरो इंडियन सुपर लीगमधील महत्त्वाच्या लढतीत गुरुवारी बंगळुरू एफसीने गुणतक्त्‌यात आघाडीवर असलेल्या एफसी गोवा संघाचा धडाका त्यांच्या घरच्या मैदानावर रोखण्याचा पराक्रम केला. कर्णधार सुनील छेत्रीच्या गोलच्या जोरावर बंगळुरूने 2-1 अशी बाजी मारली. या पराभवानंतरही गोव्याने सरस गोलफरकामुळे आघाडी कायम राखली, पण कमी सामने असणे आणि अपराजित मालिका कायम राहणे बंगळुरूसाठी महत्त्वाचे ठरले. धसमुसळ्या खेळामुळे आणि खेळाडूंमधील शाब्दिक चकमकींमुळे या लढतीत मैदानावर धुमश्‍चक्री उडाली होती.

मध्यंतरास बंगळुरूकडे एका गोलची आघाडी होती. राहुल भेकेच्या गोलमुळे बंगळुरूने पूर्वार्धात खाते उघडले होते. ब्रॅंडन फर्नांडीसने 72व्या मिनिटाला गोव्याला बरोबरी साधून दिली, पण पाच मिनिटांनी छेत्रीने गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला. यामुळे बंगळुरू एफसीसाठी छेत्रीचा शंभरावा सामना संस्मरणीय ठरला.

गोव्याला आठ सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला. पाच विजय व एका बरोबरीसह त्यांचे 16 गुण कायम राहिले. बंगळुरूने सहा सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून एका बरोबरीसह त्यांचेही 16 गुण झाले. यात गोव्याचा 8 (22-14 ) हा गोलफरक बंगळुरूच्या 7 (12-5) पेक्षा थोडक्‍यात सरस ठरला. बंगळुरूचे मात्र सहा, तर गोव्याचे दोन जास्त म्हणजे आठ सामने झाले आहेत. पुढे जाऊन हे बंगळुरूसाठी फायद्याचे ठरेल.

36व्या मिनिटाला झिस्को हर्नांडेझला पाडल्याबद्दल महंमद अली याला पहिल्यांदा यलो कार्ड दाखविण्यात आले. मग 47व्या मिनिटाला त्याने चेंडू हाताने अडविला. झिस्कोनेच हे पंचांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लाईन्समनशी चर्चा करून यलो कार्ड दाखविले. त्यामुळे अलीला मैदान सोडावे लागले. 59व्या मिनिटाला बंगळुरूचा एक खेळाडू कमी झाला. ह्युगो बौमौस याला चेहऱ्यापाशी मारल्याबद्दल डिमास डेल्गाडोला मैदान सोडावे लागले.

भेकेने 34व्या मिनिटाला डाव्या पायाने अप्रतिम फटका मारत गोल केला. डिमास डेल्गाडो याने घेतचलेल्या कॉर्नरवर झिस्को हर्नांडेझ याने केलेला प्रयत्न हुकला, पण आपल्या दिशेने चेंडू येताच मिळालेल्या संधीचे भेकेने सोने केले. त्याने नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारलेला चेंडू गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला अडविता आला नाही.

दुसऱ्या सत्रात गोव्याने 72व्या मिनिटाला बरोबरी साधली. कोरोने ही चाल रचत चेंडू बॉक्‍समध्ये आणला आणि ब्रॅंडन फर्नांडीसला पास दिला. बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने झेप टाकत चेंडू थोपविला, पण अल्बर्ट सेरॅनला लागून चेंडू नेटमध्ये गेला. त्यानंतर स्थानिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. त्यांचा आनंद मात्र पाचच मिनिटे टिकला. 77व्या मिनिटाला बंगळुरूला कॉर्नर मिळाला. उजवीकडून उदांता सिंगने अचूक फटका मारला आणि हेडिंगची संधी मिळताच छेत्रीने आपले कौशल्य पणास लावले.

सामन्याची सुरवात चुरशीची झाली. सहाव्या मिनिटाला गोव्याच्या जॅकीचंदला मध्य रेषेपाशी चेंडू मिळाला. त्याने घोडदौड केली, पण कुणी सहकारी आसपास नसल्याने त्याने स्वतःच लांबून फटका मारला, पण चेंडू बाहेर गेला. पुढच्याच मिनिटाला बंगळुरूने प्रयत्न केला. उदांता सिंगने उजवीकडून मिळालेल्या कॉर्नरवर फटका मारला. नेटसमोर आलेला चेंडू नवाझने पंच टाकून बाजूला घालविला.

दहाव्या मिनिटाला कार्लोस पेना याने डावीकडून पलिकडील बाजूला क्रॉस पास जिला. त्यावेळी गोलसमोरील कोरोने फटका मारला, पण बंगळुरूच्या जुआनन याने डाईव्ह मारत चेंडू ब्लॉक केला. हा चेंडू ह्युगो बौमौस याच्यापाशी गेला. त्याने केलेला प्रयत्न मात्र गुरप्रीतने अपयशी ठरविला.

16व्या मिनिटाला जॅकीचंदने उजवीकडून पास मिळताच घोडदौड केली. त्याने बॉक्‍समध्ये मारलेला चेंडू गुरप्रीतने सहज अडविला. 20व्या मिनिटाला कोरोने मध्य क्षेत्रात उजवीकडून जॅकीचंदला पास देण्याचा प्रयत्न केला, पण जॅकीचंद थोडा आधीच हलल्यामुळे ऑफसाईडचा इशाला झाला. दोन मिनिटांनी ह्युगोने मुसंडी मारली. तो बॉक्‍समध्ये सेरीटॉन फर्नांडीसला पास देण्याच्या प्रयत्नात असतानाच गुरप्रीत पुढे सरसावला आणि त्याने चेंडू ताब्यात घेतला. 28व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक अहमद जाहौह याच्या ढिलाईमुळे छेत्रीला संधी मिळाली. त्याने डाव्या पायाने मारलेला फटका नवाझने अडविला.

निकाल : एफसी गोवा : 1 (ब्रॅंडन फर्नांडीस 72) पराभूत विरुद्ध बंगळुरू एफसी : 2 (राहुल भेके 34, सुनील छेत्री 77)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)