डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीने राष्ट्रवादीत फूट; लांडे समर्थकही अस्वस्थ

फ्लेक्‍सबाजी, सोशल मीडियासह उघड-उघडही विरोध

पिंपरी – शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी उफाळली आहे. पक्ष प्रवेशानंतर अवघ्या 15 दिवसांत त्यांनी उमेदवारी दिल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाचे काम करत असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.

विशेषतः भोसरी परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उघड-उघड विरोध करु लागले आहे. माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या लांडे समर्थकांनी जाहीर फ्लेक्‍स लावून डॉ. कोल्हे यांना “पाडण्याचा’ मानस व्यक्‍त केला आहे. सोशल मीडियाद्वारे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर शरसंधान साधत शिवसेनेच्या आढळरावांचा चौकार निश्‍चित करु, असा “घरचा आहेर’ दिला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असूनही मागील तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या आढळराव पाटलांनी या मतदारसंघावर विजय मिळवला आहे. आपल्याला सोयीस्कर ठरतील अशी सर्व समीकरणे आढळरावांनी गेल्या 15 वर्षांच्या कार्यकाळात जुळवून आणली आहेत. लोकसभा जिंकण्यासाठी या परिसरात समांतर शिवसेना उभी केल्याचा आरोप आढळरावांवर होतो.

आढळरावांनी सलग लोकसभेच्या निवडणुका जिंकूनही जिल्हा पातळीवर शिवसेनेला विशेष काही मिळवून देऊ शकले नाहीत. स्वतःचा मतदारसंघ त्यांनी सर्वपक्षीय हितसंबंध जोपासत बालेकिल्ला बनविला. ही सर्व स्थिती पाहता आढळरावांचे मतदारांमधील प्राबल्य ध्यानात येऊ शकते. त्यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणे राष्ट्रवादीसाठी खूप अवघड ठरणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला किमान आपल्या पक्षाची मते आणि मने सांभाळणे गरजेचे झालेले आहे. अशा परिस्थितीत ही बंडाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला परवडणारी नाही.

आढळराव पाटलांना चौकार मारण्यापासून रोखायचेच या इराद्याने सुरवातीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघात आक्रमक पवित्रा घेतला होता. सुरवातीला पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी आढळरावांच्या विरोधात लढत द्यावी अशी गळ घालण्यात आली होती. मात्र, वळसे-पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर नाराज झालेल्या अजित पवारांनी “जर कोण लढणार नसेल तर मीच आढळरावांच्या विरोधात निवडणूक लढवतो’ असा पवित्राही घेतला होता. या घडमोडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना तयारीला लागण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे लांडे यांनीही आढळरावांच्या विरोधात शड्डू ठोकत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.

विविध मुद्यावर आढळरावांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागच्या काही दिवसांपूर्वी अभिनेते व शिवसेनेचे नेते डॉ. कोल्हे यांनाच राष्ट्रवादीने आपल्या पक्षात घेतले आणि निवडणूक रिंगणात उतरवले. यामुळे विलास लांडे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या लांडे समर्थकांनी अवघ्या काही मिनिटातच सोशल मीडियाद्वारे डॉ. कोल्हेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

लांडे समर्थक ठरु शकतात अडथळा

लोकसभा निवडणुकीत 2009 साली राष्ट्रवातिकीट दिले होते. तेव्हा शिवाजीराव आढळराव यांना 4 लाख 82 हजार मते (57.54 टक्‍के) मिळाली होती, तर विलास लांडे यांनी 3 लाख 39 हजार मते (36.24 टक्‍के) मिळवली होती. विलास लांडे हेच नाव असलेला अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होता. त्यांना देखील 14196 मते (1.69 टक्‍के) 2014 साली राष्ट्रवादीने देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवले, तेव्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 6 लाख 43 हजार मते (59.06 टक्‍के) मिळवून विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांना 3 लाख 41 हजार मते मिळाली (31.35 टक्‍के) होती. ही आकडेवारी पाहता विलास लांडे यांच्या समर्थकाची नाराजी डॉ. कोल्हे यांच्या मार्गात मोठा अडथळा बनू शकते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)