राज्याच्या दुष्काळी भागात विविध उपाययोजनांना गती

संग्रहित छायाचित्र.....

प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता देणार

मुंबई – रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सध्या 36 हजार 660 कामे सुरु असून त्यावर तीन लाख 40 हजार 352 मजूर काम करीत आहेत. याशिवाय शेल्फवर 5 लाख 74 हजार 430 कामे आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्यावेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. हा संदर्भ घेऊन रोजगार हमी योजनेंतर्गत मागणी करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तीन दिवसात मंजूर करण्यात यावेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्यात येणार असल्याने या लहान जनावरांनाही दुष्काळात मदत मिळणार आहे.

दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील साडेआठ लाख कुटुंबे आणि 35 लाख व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट केले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 60 लाख शेतकऱ्यांना या अगोदरच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तसेच दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तात्काळ देण्याचे आदेशही देण्यात आले.

राज्यात सध्या 13 हजार 801 गावे-वाड्यांमध्ये 5,493 टॅंकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टॅंकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक टॅंकर्स औरंगाबाद विभागात सुरू आहेत. या विभागात 2,824 गावे-वाड्यांमध्ये 2,917 टॅंकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 1,429 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 8 लाख 42 हजार 150 मोठी आणि एक लाख दोन हजार 630 लहान अशी सुमारे 9 लाख 44 हजार 780 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (छऊठऋ) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)