लक्षवेधी: भाषण ते शासन

सागर ननावरे

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने चांगलीच गती घेतलेली आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय प्रचारसोहळा ऐन रंगात आला आहे. प्रचारांत सोशल मीडिया, घोषणाबाजी, बॅनर्स, जाहीरनामे, गाठीभेटी या अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. मात्र, यातही प्रचाराचे सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणजे राजकीय नेत्यांच्या सभा. कमीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांना एकाचवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे प्रचारसभा. या प्रचारसभांत जाहीर सभा, कोपरा सभा, कार्यकर्ता मेळावा असे विविध प्रकारही पाहायला मिळतात. सभांना जमणारी गर्दी प्रचारात अधिकच रंगत आणत असते. त्यातही वरिष्ठ, पक्षप्रमुख, पक्षश्रेष्ठी आणि स्टार प्रचारकांच्या सभा म्हणजे कार्यकर्ते आणि मतदारांसाठी श्रवणीय मेजवानीच.

सध्या लोकसभेच्या प्रचारसभा जनमानसावर चांगलीच पकड बसवित आहेत. टीका-टिप्पणी आणि आश्‍वासनांची खैरात सभांमध्ये पाहायला मिळत आहे. कार्यकर्तेही या सभांच्या क्‍लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करून प्रचारात आघाडी घेत आहेत.

राजकारण आणि वक्‍तृत्व यांचा तसे पाहता अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्येक वक्‍ता राजकीय व्यक्‍ती असावा हे गरजेचे नसते. परंतु प्रत्येक राजकीय व्यक्तीने एक चांगला वक्‍ता असणे हे अपरिहार्य असते. कारण राजकारणात कर्तृत्वाला वर्क्‍तृत्वाची जोड मिळाली तरच एक चांगले राजकीय नेतृत्व उदयास येत असते.

राजकारण आणि वक्तृत्व यांचे नाते हे जागतिक स्तरावरही अगदी पूर्वापारपासून चालत आलेले आहे. यात अठराव्या शतकातील अब्राहम लिंकन यांच्या गुलामगिरीविरोधातील गेटीझबर्ग येथील भाषण अतिशय लोकप्रिय ठरले होते. या भाषणाने अब्राहम लिंकन यांची जनमानसावर चांगलीच छाप पडली होती. त्याचप्रमाणे इंग्लडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे मायभूमीच्या स्वातंत्र्यावरील 1942 चे भाषणही गाजले होते. विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावरच अल्पावधीतच राजकीय दबदबा निर्माण केला होता. त्यांनतर हिटलर आणि मुसोलिनी यांच्यासारख्या हुकुमशहांनी भाषणातील जहालतेने संपूर्ण देशातील नागरिकांच्या भावना भडकावल्या होत्या. याचा युद्धकाळात त्यांना मोठा फायदा झाला होता.

भारताचा विचार करायचा झाल्यास भारतानेही जगाला अनेक प्रभावी वक्ते दिले आहेत. भारतीय राजकारण हे नेहमीच जगात चर्चेचा विषय राहिले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेदेखील एक उत्तम वक्ते होते. त्याचप्रमाणे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही आपल्या भाषणांनी जनसागरावर प्रभाव पाडला होता.

भारतीय राजकारणात लोकसभेचा विचार करता राम मनोहर लोहिया, नाथ पै, बाळासाहेब खर्डेकर, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या वक्‍त्यांनी आपल्या भाषणांनी उत्तम संसदपटू होण्याचा बहुमान मिळविला होता. अटलबिहारी वाजपेयींची भाषणे ऐकण्यासाठी तर लोक उत्सुक असत. संथ गतीने परंतु मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असत.

महाराष्ट्राला वक्तृत्वाचा संपन्न असा वारसा लाभलेला आहे. लोकमान्य टिळक, अत्रे यांसारख्या विचारवंतांनी आपल्या वक्‍तृत्वाने लोकांवर अक्षरशः मोहिनी घातली होती. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची देशालाही दखल घेण्यास भाग पाडले.

सध्याही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रभावी राजकीय वक्‍ते प्रसिद्ध आहेत. लोकसभेच्यानिमित्ताने त्यांची भाषणे हा चर्चेचा विषयही ठरत आहेत. राजकारणात भाषणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एक भाषण एखाद्या राजकीय नेतृत्वाचा उदय करू शकते त्याचप्रमाणे एखादे अयोग्य भाषण हातची सत्ताही घालवू शकते. नेतृत्व आणि कर्तृत्व असतानाही केवळ वक्तृत्व नसल्याने अनेकदा राजकीय समीकरणे वेगाने उलट दिशेने धावतात. सध्याच्या युगात चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा असणारा राजकीय विजयरथ फक्त वक्तृत्वकला नसल्याने जागीच थांबतो. त्यामुळे शक्‍यतो राजकीय क्षेत्रात “भाषण ते शासन’ असा प्रवास सहज शक्‍य झालेला दिसून येतो.

सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भाषणबाजीला उधाण आले आहे; परंतु त्यातही टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज बनून झळकण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी भाषणेच मते मिळवून देणार यात शंका नाही. भाषणांच्या जोरावर कोण शासन स्थापणार आणि कोण विरोधात बसणार हे मात्र लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी सध्या राजकीय भाषणांचा आस्वाद घेण्यासारखा दुसरा आनंद नक्कीच नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)