विशेष मुलाखत : जिल्हा रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा देणार

संदीप राक्षे

जिल्हा रुग्णालय ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची आरोग्य संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख डॉ.आमोद गडीकर यांच्याशी प्रभातने साधलेला संवाद.

जिल्हा रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात काय अडचणी जाणवतात ?

डॉ. आमोद गडीकर – जिल्हा रुग्णालयावर आजही उपचाराच्या दृष्टीने रूग्णांचा प्रचंड विश्वास आहे. जिल्हा रुग्णालयासह पंधरा ग्रामीण रुग्णालये दोन उपजिल्हा रुग्णालये यांच्या माध्यमातून आंतररुग्ण व बाह्यरुग्ण असे तब्बल नव्वद हजार रुग्ण येथील सेवेचा लाभ घेतात. उपलब्ध मनुष्यबळाचा अभाव, सुपरस्पेशालिटी तंत्रज्ञान, विशेष निष्णात डॉक्‍टर यांची कमतरता, व्यवस्थापनातल्या सेवक वर्गाला चाकोरीबध्द काम करायची लागलेली सवय, यामुळे कामकाजात प्रचंड शैथिल्य जाणवत आहे. यासाठी प्रत्येक विभागाची थेट भेट आणि अडचणी जाणून घेणे जाग्यावर कामाचा निपटारा करणे इ. उपाययोजना तत्काळ सुरू केल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयाला स्पेशालिस्ट डॉक्‍टर मिळत नाही त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.काय सांगाल ?

डॉ. आमोद गडीकर –जिल्हा रुग्णालयाला वर्ग -1 चे एमडी दर्जाची तीन पदे मंजूर आहेत. पण सध्या एकच डॉक्‍टर उपलब्ध आहेत. स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची 18 पदे मंजूर असताना प्रत्यक्षात दहाच डा ॅक्‍टर कार्यरत आहेत. प्रसूती तज्ञांची तीन पदे मंजूर असताना एकच प्रसूती तज्ञ उपलब्ध आहेत. एक डॉक्‍टर सध्या प्रसूती काळाच्या रजेवर आहेत. तब्बल सव्वीस डॉक्‍टरांची पदे ही करार तत्वावरची आहेत. जिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ मानसोपचार तज्ञ उपलब्ध नाही. त्यामुळे क्‍लिनिकल सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागते. डॉक्‍टरांच्या येथील सेवा ही बांधिलकीच्या स्वरूपाची मानली जाते. तसेच येथील डॉक्‍टरांना मिळणारे मानधनं कमी असल्याने जिल्हा रुग्णालयाची पदे रिक्त राहतात.

इतक्‍या अडचणी असतानाही जिल्हा रुग्णालायाची काय वैशिष्टये आहेत ?

डॉ. आमोद गडीकर – जिल्हा रुग्णालयाची प्रशस्त दगडी इमारत आणि प्रशस्त आवार त्या दृष्टीने येथे राखली जाणारी प्रचंड स्वच्छता हे वैशिष्टय जाणवते. दिवसाला बाह्यरुग्ण विभाग पंचवीस हजार पेशंटला सेवा देतो. येथील खाटांची क्षमता 242 आहे. मात्र प्रत्यक्षात साडेतीनशे पेशंट असतात. नवजात शिशु काळजी विभाग (एनआयसीयु) तसेच आयुष विभाग हे विभाग खूप चांगल्या पध्दतीने चालविले जातात. येथील उपचार सेवा या खूप उच्च दर्जाच्या आहेत. मात्र सरकारी दवाखाना या दृष्टीने बघण्याची रुग्णांची जी दृष्टी आहे ते बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंतररुग्ण विभागासाठी तीन पाळ्यामध्ये डॉक्‍टर व इतर वैद्यकीय सु विधासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.

तुम्ही पदभार घेतल्यापासून जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजात काय बदल केलेत ?

डॉ. आमोद गडीकर – गेल्या एकवीस वर्षाच्या माझ्या वैद्यकीय वाटचालीमध्ये मी 1997 ते 2015 अशी अठरा वर्ष मी नेत्रतज्ञ म्हणून सेवा बजावली आहे. साताऱ्यात जिल्हा शल्यचिकित्सक ही माझी पहिलीच पोस्टिंग आहे. पदभार स्वीकारून मला तीन महिने झाले आहेत. येथील कामक ामाजामध्ये झापडबंद कामाची जी सरकारी छाप आहे ती तोडून रुग्णसेवा ही बांधिलकी आहे ही ठसवण्याचा माझा प्रयत्न आहे. विभाग प्रमुखांच्या आढावा बैठका, ओपीडी आयपीडी तसेच इतर एकवीस विभागांचा आढावा, एकाच टेबलला वर्षानुवर्ष काम करणायांची बदली, डॉक्‍टर तसेच नर्स व इतर कर्मचाऱ्यांना वेळ त येण्याची दिलेली सूचना असे बरेच प्रयत्न चालू आहेत. वर्षानुवर्ष जिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणीची यंत्रणा धूळ खात पडून होती ती तत्काळ मी चालू करण्यासाठी आदेश दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी सुरू केल्याने रांगेत ताटकळण्याचा त्यांचा त्रास वाचला. पोलीस केसमध्ये मेडिकल हिस्ट्रीचे कागद मात्र जपून ठेवले जातात. केसपेपर सांभाळण्याचे काम पेशंटलाच दिल्याने कार्यालयातील अनावश्‍यक कागदांचा निपटारा करण्याचे काम वाचले.

जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा का नाहीत ?

डॉ. आमोद गडीकर –
शासकीय रुग्णालयाकडे बघण्याची दूषित दृष्टी सर्व प्रथम बदलायला हवी. जिल्हा रुग्णालयाला सिटी स्कॅन मशीन मंजूर झाले असून त्याची वर्क ऑर्डरही झाली आहे . येत्या चार महिन्यात ही सुविधा जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहे. याशिवाय मॉड्युलर ऑपरेशन थिएटर साठी पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याची तांत्रिक प्रक्रिया सुध्दा अंतिम टप्प्यात आहे. तसेच अद्ययावत दंतचिकित्सा यंत्रणा, डायलिसिस यंत्रणा याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

साताऱ्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी काय प्रयत्न सुरू आहेत ?

डॉ. आमोद गडीकर –
मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. कॉलेजला कृष्णा नगर येथे पंचवीस एकर मंजूर झाली आहे. मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गोसावी हे या प्रक्रियेत नोडल ऑफिसर म्हणून काम करत आहेत. येथील जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून जमीन हस्तांतरण लवकरच सुरू होईल अशी माहिती येथील वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल पाचशे खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयात वावरणाऱ्या तथाकथित एजंटांची साखळी असल्याची तक्रार आहे त्यांचा काय बंदोबस्त करणार ?

डॉ. आमोद गडीकर – रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात थेट डॉक्‍टरांशी संपर्क करून आपल्या अडचणींचे निराकरण करावे. कोणत्याही अनोळखी माणसाच्या भूलथापांना बळी पडू नये. रुग्णालयात जर कोणी असे आढळले तर त्याची थेट माझ्याकडे तक्रार करा. प्रशासनातले कोणी असेल तर जरूर संपर्क साधा, सत्यतेची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. जिल्हा रुग्णालय हे रुग्णसेवेचे मंदिर आहे. येथे चिरीमिरीचे उद्योग चालत नाहीत आणि क मिशन खोर एजंटांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कठोर पावले उचलण्यात येतील.

जिल्हा रुग्णालयासाठी आणखी काही सुविधा देण्याचे काय नियोजन आहे ?

डॉ. आमोद गडीकर – सातारा जिल्ह्यात नव्वद हजार पेशंटसाठी वर्षाला सव्वासात कोटीची औषधे वर्षाकाठी लागतात. डीपीडीसी व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अडिच कोटींचा निधी उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक असणाऱ्या 429 प्रकारच्या औषध खरेदीची मुख्यं अडचणं होते. याशिवाय जिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा, प्युरिफाईड वॉटर, पूर्ण वेळ डॉक्‍टरांची विशेष सेवा, आणि जिल्हा रुग्णालयाचा स्पेशालिटी दर्जा निर्माण करणे ही कामाची मुख्य उद्दिष्ट आहेत.

प्रभात: जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा कमी आणि कामगार संघटनांचेच राजकारण चालते अशी तक्रार आहे, काय सांगाल ?

डॉ. आमोद गडीकर – माझा कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी मानसिकदृष्टया स्वस्थ असेल तर काम शंभर टक्के होऊ शकते. त्यासाठी संवाद, कामाचे सुसूत्रीकरणं, चाकोरी तोडण्याची तयारी यांसारख्या उपाय योजना सुरू आहेत. रू ग्णसेवा ही बांधिलकी आहे त्याचे बाजारीकरण कोणीही करू नये. मी या स्पष्ट मताचा आहे. नाठाळांची बिघडलेली तब्येत कशी सुधरवायची याची वेगवेगळी इंजेक्‍शन आहेत. कामगारांच्या तक्रारीचा निपटारा होइलच. त्यांच्या राजकारणात आपल्याला स्वारस्य नाही. करण्यासारखी बरीच कामे उपलब्ध आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासाठी तुम्ही काय योगदान देणार ?

डॉ. आमोद गडीकर – सातारा जिल्ह्याला आणि क्रांतिसिंह नाना पाटील या नावाला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील नागरिकांची सहकार्य करण्याची वृत्ती, पाठबळ देणारे राजकीय नेतृत्व यामुळे कामाला पुष्कळ संधी आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण हा मुख्य अजेंडा खूप स्पष्ट आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सुपर स्पेशालिटीचा दर्जा जिल्हा रुग्णालयाला मिळवून देणे ही मुख्य धडपड आहे. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा, मानवी संसाधनांचा विकास या गोष्टी सातत्याने सुरूच राहणार आहेत. माझ्या कार्यकाळात सर्वोत्तम काम करण्याचा माझा प्रयत्न राहिल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)