मुख्यमंत्री सहायता निधीतून वॉटरकप विजेत्या गावांना विशेष मदत करणार – मुख्यमंत्री

पुणे: पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची चळवळ गतीमान झाली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी वॉटरकप स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष मदत करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पाणी फौंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पाणी फाऊंडेशनचे प्रमुख आमीर खान, किरण राव उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फाऊंडेशनचे राज्यातील काम गौरवास्पद आहे. वॉटरकप स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम व व्दितीय पुरस्कार विजेत्या गावांना प्रत्येकी ५ लाख आणि तृतीय पुरस्कार विजेत्या गावांना ३ लाख रुपये शासनाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल. याशिवाय या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासही प्राधान्य दिले जाईल.
शासनाच्यावतीने गटशेतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत १ कोटी पर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जातो. पुरस्कारप्राप्त गावातून असा प्रस्ताव सादर झाल्यास त्या गावांना प्राधान्य देवून निधी दिला जाईल, असे ते म्हणाले. आमिर खान आणि त्यांच्या चमूचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आमिर खान यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल असे गौरवोद्गार काढले.
प्रा. राम शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून ५ वर्षात २५ हजार गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. आतापर्यंत २२ हजार पेक्षा जास्त गावांमध्ये ५ लाखांहून अधिक जलसंधारणाची कामे झाली आहेत. यापूर्वी ५ हजार टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. तो आकडा गेल्या तीन-चार वर्षात ५०० ते ७०० वर आला आहे. पाणी फौंडेशनने समाजाभिमुख, लोकाभिमुख कामे करून शेतकरी समृध्द करण्याचे व्रत हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात आपले आदर्श गाव या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डब्लूओटीआर संस्थेचे क्रिस्तीनो, संदीप जाधव, स्पर्श प्रशिक्षण संस्थेचे अनंत मोरे, जिया सय्यद यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पाणी फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, पोपटराव पवार, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, डॉ. अविनाश पोळ, गिरीश कुलकर्णी, गितांजली कुलकर्णी, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यजित भटकळ यांनी तर सूत्रसंचालन जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी यांनी केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)