पिंपरी – चिखली कुदळवाडी या ठिकाणी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्ममधून विजेच्या ठिणग्या उडून भंगाराच्या गोदामात पडल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोई फाट्याजवळ कुदळवाडी, चिखली येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती दिनेश यादव यांनी अग्निशमन विभागाला दिली.
त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र चिखली आणि तळवडे विभागाचे तीन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. गोदामाजवळ महावितरणचा इलक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर आहे. त्यामधून पहाटे विजेच्या ठिणग्या भंगारच्या गोदामात पडल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. यामध्ये, गोदामातील ग्राइंडिंग मशीन, ऍल्युमिनियम, कास्टिंग मटेरियल आणि भंगार माल जळाला. महावितरणची वायरही जळाली.