होय सोरायसिस बरा होऊ शकतो! भाग ३ (वनौषधींचा वापर)

डॉ. जयदीप महाजन
दर वर्षी ऑगस्ट महिना हा जागतिक पातळीवर सोरायसिस जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही, पण या आजारात त्वचेवर निर्माण होणारे चट्टे रुग्णांच्या भावनांवर, वागणुकीवर परिणाम करतात. अशा वेळी सकारात्मकवृत्तीनं या आजारावर उपचार घेतल्यास नक्की बरं होता येतं. फक्त संयम आणि काळजी महत्त्वाची असते. 
वनौषधींचा वापरही करता येतो… 
सोरायसिस हा आजार वनौषधींच्या सहाय्यानं तसंच व्यवस्थित पथ्यं पाळल्यास बरा होऊ शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही. तसंच तो फक्त पाच ते 10 टक्के या प्रमाणातच आनुवंशिक आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता सोरायसिसच्या रुग्णांनी औषधोपचाराकरता स्वत:हून पुढाकार घ्यावा. या आजाराचा औषधोपचार स्वत:च करू नये. तर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानं करावा.
त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन त्या ठिकणी खाज सुटणं, त्वचेतून चंदेरी रंगाचे माशांच्या खवल्यांप्रमाणे खवले पडणं ही सोरायसिस या त्वचाविकारातील प्रमुख महत्त्वाची लक्षणं. या विकाराची सुरुवात डोक्‍याच्या टाळूपासून झाल्यास कोंडा झालाय, असं समजून या त्वचाविकाराकडे दुर्लक्ष करू नये. या रोगाची सुरुवात ही प्रामुख्याने डोक्‍याच्या टाळूवरून, कानांमागून, कोपरं आणि ढोपरांच्या त्वचेवरून होते. हा रोग संसर्गजन्य नसला तरी वेळीच योग्य ते उपचार करून घेणं गरजेचं असतं.
रोगप्रतिकारशक्तीत बिघाड झाल्यामुळे सोरायसिस हा त्वचाविकार डोकं वर काढतो. प्रतिकारशक्तीतील बिघाड हा रक्तातील पांढऱ्या पेशींत जनुकीय गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे होतो. या आजारात त्वचेच्या एका भागावर जास्त त्वचेचे थर निर्माण होतात. त्यामुळे त्वचा जाडसर होते. ती दिसायला खराब दिसते. सोरायसिसचा आजार जडलेली व्यक्ती ही सार्वजनिक जीवनाला मुकते. घरचेही या व्यक्तीपासून दूर पळतात. या आजाराचा उपचार आयुर्वेदात आहे का, तर नक्कीच आहे.
आयुर्वेदात त्वचाविकारांना कुष्ठ असं म्हणतात. आयुर्वेदात सांगितलेल्या कुष्ठविकाराचा एक प्रकार म्हणजेच महारोग. मात्र, सर्वच कुष्ठरोगाचे प्रकार महारोगात मोडणारे नाहीत. कारणं या रोगाची कारणं निश्‍चित नाहीत. या रोगाला वयाचं बंधन नाही. पाच ते पंधरा वयोगटातल्यांना हा विकार जडण्याची जास्त शक्‍यता असते. हा जंतुसंसर्गाने होणारा विकार नाही. कधी कधी हा रोग अनुवांशिक असू शकतो. आई-वडील, काका-आत्या, मामा-मावशी, आजी-आजोबा यांपैकी एखाद्याला जरी हा विकार असला तर तो पुढच्या पिढीत येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. साधारणपणे सोरायसिसचा त्रास असणाऱ्या 30 टक्के रुग्णांमध्ये आजार हा कौटुंबिक असू शकतो.
स्त्री-पुरुष दोघांनाही हा विकार होऊ शकतो. थंड प्रदेशात, तसंच हिवाळ्यात हा विकार होण्याची किंवा वाढण्याची दाट शक्‍यता असते. मानसिक चिंतांमुळे हा रोग वाढतो, असंही दिसून आलं आहे. वारंवार होणारा जंतुसंसर्गही हा विकार वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. सतत एकाच जागी मार लागत असेल तर त्याजागी या विकाराचा त्रास निर्माण होऊ शकतो. हाताच्या मागच्या बाजूला, हाता-पायांच्या बोटांच्या पृष्ठभागावर, तर पायाच्या पुढल्या बाजूस तसेच सांधे यांच्यावर हा रोग डोकं वर काढतो. गुडघे आणि कोपराच्या सांध्यावर वारंवार घर्षण होत असल्याने तिथे बऱ्याचदा सोरायसिसची चक्रंदळं (गोलकार चकत्या, चट्टे) निर्माण झालेल्या पाहण्यास मिळतात.
कसा होतो हा रोग?
या विकारात कफ आणि वात हे दोष बिघडलेले असतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात त्वचेचे दोन स्तर सांगितले असले तरी आयुर्वेदात त्वचेचे सहा ते सात स्तर सांगितले आहेत. त्या प्रत्येक त्वचेत निर्माण होणाऱ्या रोगांचंही वर्णन केलं आहे. सर्वसाधारणत: चौथ्या किंवा पाचव्या थरात कुष्ठ म्हणता येईल, असे विकार होत असतात. त्वचेतील हे स्तर पेशीविभाजनाने निर्माण होतात. हे विभाजन अवयवांचा स्वभाव तसंच वायूंमुळे होत असते. त्वचा हा मांसधातूचा उपधातू आहे. मांसधातू तयार होतांना त्वचेला उपयुक्त होईल, असा भाग त्वचेच्या निर्मितीत वापरला जात असतो. एकेक स्तर निर्माण होत होत बाह्यत्वचा निर्माण व्हायला सुमोर 27 दिवस लागतात.
परंतु बिघडलेल्या वातामुळे त्वचेतल्या थरांतील पेशी लवकर तयार होतात. त्यामुळे त्यांची बेसुमार वाढ होते. परिणामी सफेद कांद्याची अगदी बाहेरची साल असावी, तसा चंदेरी रंगाचा चामडीचा थर तयार होतो. कफामुळे या पेशींचे थर पूर्णपणे न सुटता चिकटून राहतात. त्वचेतल्या केशवाहिन्या विस्कटून जातात. त्यात अधिक रक्त राहतं. त्यामुळे त्वचा लाल व जाडी होते. जाड झालेल्या त्वचेवर अर्धवट सुटलेले पापुद्रे असल्याने त्वचेचं स्वरूप माशांच्या खवल्यांसारखं होतं. म्हणून त्या पापुद्य्रांना शकल (खवले) असं म्हणतात. काही पापुद्रे हे अभ्रकाच्या पत्र्यांप्रमाणे दिसतात. सोरायसिसच्या जखमांमधून जर रक्त जास्त वाहात असेल तर सोरायसिसचे चट्टे लाल रंगाचे दिसतात. नाहीतर चट्टयांचा रंग काळ्या किंवा करड्या रंगाचा असतो, असे चट्टे शरीराच्या ज्या भागावर असतात तिथे घाम येत नाही. हाता-पायांच्या तळव्यांवर हा रोग झाल्यास तिथली त्वचा कडक होऊन फाटते.
या विकारात त्वचेवर येणाऱ्या चट्ट्यांना निश्‍चित आकार नसतो. कधी कधी आकार लहान-मोठा असतो. डोकं कोपर, गुढघे, कंबर, माकड हाड, पोट, पाठ, हातापायाचे तळवे या ठिकाणी या विकाराचे चट्टे मोठ्या प्रमाणावर दिसतात. कधी कधी काखेत किंवा शरीरातील नाजूक भागांवरही अशा चकत्या निर्माण होतात. या चकत्यांवर पापुद्रे सुटत नाही. मात्र, वारंवार खाज येते. मध्यम वयाच्या स्थूल पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या अशा चट्ट्यांचं प्रमाण अधिक असतं. त्याला flexural type of psoriasis असं म्हणतात. काही व्यक्तींच्या नखांवरही बारीक खड्डे पडलेले दिसतात. नखं कुरतडल्यासारखी, खरखरीत आणि जाड होतात. काही रोग्यांचे सांधे आमवातासारखे सुजतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)