होय सोरायसिस बरा होऊ शकतो! भाग १ (सोरायसिसचे प्रकार)

डॉ. जयदीप महाजन
दर वर्षी ऑगस्ट महिना हा जागतिक पातळीवर सोरायसिस जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही, पण या आजारात त्वचेवर निर्माण होणारे चट्टे रुग्णांच्या भावनांवर, वागणुकीवर परिणाम करतात. अशा वेळी सकारात्मकवृत्तीनं या आजारावर उपचार घेतल्यास नक्की बरं होता येतं. फक्त संयम आणि काळजी महत्त्वाची असते. 
 सोरायसिस या रोगाचे बरेच प्रकार आहेत. त्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारा प्रकार म्हणजे लाल रंगाचे चट्टे उठणं. सोरायसिस झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांमध्ये हाच प्रकार दिसून येतो. यामध्ये लालसर रंगाच्या चकत्या येतात. या चकत्या गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. चकतीचा पृष्ठभाग खडबडीत तर कधी पांढऱ्या खवल्यांचा असतो. हे सफेद चंदेरी रंगाचे खवले सैलसर चिकटलेले असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाजवल्यानंतर भुशाप्रमाणं खाली पडतात. त्वचेच्या बाह्यपेशींचं (एपिडर्मिस) फारच जलदगतीनं विभाजन झाल्यामुळे त्वचा जाड होते. पातळ पापुद्य्रासारखे खवले निघतात. चट्टे हे साधारणत: सर्वप्रथम कोपर, गुडघे, डोक्‍याची त्वचा आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात दिसतात. काही रुग्णांमध्ये ते हळूहळू अंगभर पसरतात. घडीचा, ठिपक्‍यांचा, नखांचा, पुळीचा, डोक्‍याचा, सर्व अंगभर, सांध्यांचा, हाता-पायांचा हे सोरायसिसचे काही प्रकार आहेत.
आजाराची कारणं 
या आजाराचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव! दारू पिण्याचं वा सिगारेट ओढण्याचं व्यसन असणाऱ्यांनाही सोरायसिस होतो. हिवाळ्यात या आजाराचं प्रमाण वाढतं, उन्हाळ्यात कमी होतं; परंतु कधी-कधी जास्त सूर्यप्रकाशही हानीकारक ठरू शकतो. तर कधी औषधांमुळेही सोरायसिसचा आजार बळावतो. जसं की, मलेरियाची औषधं (क्‍लोरोक्विन), वेदनाशामक औषधं, उच्चरक्तदाब कमी करण्याची औषधं, लिथिअमसारखी मानसिक आजारांवरील औषधं.
इंडियन सोरायसिस फाउंडेशनने सोरायसिस या आजाराच्या उगमाची कारणं शोधली आहेत. त्यानुसार हा आजार म्हणजे शरीरांतर्गत पेशींची एकमेकांमधली लढाई आहे. या आजाराचं दुसरं कारण आहे आनुवंशिकता. सोरायसिसच्या 30 टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिकता हे कारण आढळून आलं आहे. जर आई-वडील दोघंही सोरायसिसनं आजारी असतील, तर मुलाला सोरायसिस होण्याची शक्‍यता 30 टक्‍क्‍यांनी वाढते.
सोरायसिसचे प्रकार 
घडीतला सोरायसिस
या प्रकारात शरीराच्या घडी पडणाऱ्या भागांवर चट्टे येतात. स्त्रियांच्या स्तनांच्या खाली किंवा जांघेत, चट्टे अडचणीच्या जागेत येतात. अशा जागांमध्ये सतत घाम येतो व तो पुसला न गेल्यामुळे ते भाग ओलसर राहतात. या चट्ट्यांवर खवले कमी दिसतात.
नखांचा सोरायसिस 
हाता-पायांच्या बोटांच्या नखांच्या आकारात बदल होतो. नखं जाड होतात. नखांवर एक ते दोन मीमी आकाराचे छोटे खड्डे दिसतात. ठिसूळ बनतात. नखांचा कडक भाग त्याच्या गादीपासून वेगळा होतो. हळूहळू ती पिवळी दिसायला लागतात. नखांखाली तेलाचा चट्टा आल्यासारखा दिसतो.
पुळीचा सोरायसिस
या प्रकारात शरीराच्या ज्या भागावर तो होतो, त्या ठिकाणी खवलं येत नाहीत. तर प्रथम त्वचा लालसर होते. त्यावर पूनं पिकलेल्या छोट्या-छोट्या पुळ्या येतात. नंतर त्या पुळ्या करड्या रंगाच्या होऊन नंतर त्या सुकतात.
ठिपक्‍यांचा सोरायसिस 
यात छातीवर, पाठीवर छोटे-छोटे ठिपके पसरलेले दिसतात. सोरायसिसचा हा प्रकार बऱ्याचदा लहान मुलं आणि तरुणांमध्ये आढळून येतो. या प्रकारच्या सोरायसिसची सुरुवात ही अनेकदा टॉन्सिलायटिस, घशाचा दाह अशा संसर्गजन्य आजारांनंतर होते.
सर्व अंग सोरायसिस 
नावाप्रमाणंच या प्रकारातला सोरायसिस सर्वांगावर येतो. हा साधारण सोरायसिसपेक्षा वेगळा दिसतो. संपूर्ण त्वचा लालसर दिसते. त्यावरून पातळ पापुद्रे सुटायला लागतात. मात्र भरपूर खाज येते.
डोक्‍याचा सोरायसिस
यामध्ये फक्त डोक्‍यावरच लालसर चट्टे येतात. त्यावर पांढऱ्या रंगाचे खवले असतात.
हातापायांचा सोरायसिस
हा प्रकार अतिशय वेदनादायी असतो. यात हाताच्या तळव्यांवर काही ठिकाणी त्वचा जाड, कडक होते. काही ठिकाणी त्वचेवर भेगाही पडतात. या भेगा अत्यंत वेदनादायी असतात. जाड झालेल्या त्वचेचे पापुद्रे सुटायला लागतात. खाजही येते.
सांध्यांचा सोरायसिस
सोरायसिसचा आजार असणाऱ्या पाच टक्के रुग्णांना या प्रकारचा सोरायसिस होतो. यात बोटांचं शेवटचं पेर सुजतं, दुखायला लागतं. इतरही लहान सांधे दुखतात. हा प्रकार वाढल्यास हाडांचा वरचा पातळ थर नष्ट होतो. बोटं लहान व्हायला लागतात.
सर्वसाधारणपणे त्वचेच्या अन्य प्रकारच्या आजारांमध्ये निरोगी त्वचा यायला सर्वसाधारणपणे 28 दिवसांचा कालावधी लागतो; परंतु सोरायसिसमध्ये हेच काम चार दिवसांत होते. त्यामुळे जिथे कमकुवत त्वचा तयार होते तिथे पांढरे, चंदेरी पापुद्रे सुटतात. त्यांना स्केल्स म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजारात पांढरी खवलं पडत नाहीत. तसंच यामुळे कोणताही जंतुसंसर्ग होत नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)