भारत ‘अ’ संघाची फलंदाजी कोलमडली दक्षिण अफ्रिकेचे जोरदार प्रत्युत्तर 

बंगळुरू: हनुमा विहारी, अंकित बावणे आणि श्रीकर भारत यांच्या फलंदाजीच्या बळावर भारत अ संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 345 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका अ संघाने दुसऱ्या दिवसअखेर सॅरेल एर्वी आणि झुबेर हम्झा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 3 बाद 219 धावांपर्यंत मजल मारली आहे. आफ्रिकेचा संघ अजूनही 126 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सात फलंदाज बाकी आहेत.
तत्पूर्वी, पहिल्या दिवशी पहिल्या डावांत 4 बाद 322 धावांवर असलेला भारत अ संघ दुसऱ्या दिवशी केवळ 23 धावा जमवू शकला. यावेळी पहिल्या दिवशी नाबाद असलेले हनुमा विहारी आणि श्रीकर भारत यांना दुसऱ्या दिवशी जास्त वेळ खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. दिवसाच्या पहिल्या सत्रात 15 धावा जोडल्यानंतर भारतला बाद करत ऑलिव्हरने दक्षिण आफ्रिका अ संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. तर त्यानंतर जयंत यादव, हनुमा विहारी, युझुवेंद्र चहाल, आणि मोहम्मद सिराज हे केवळ 7 धावांतच तंबूत परतल्याने भारत अ संघाचा डाव केवळ 345 धावांतच संपुष्टात आला.
यावेळी दक्षिण आफ्रिका अ संघाकडून डुआन्ने ऑलिव्हरने 63 धावा देत भारताचे 6 फलंदाज माघारी धाडले. तर ऍनरिक नॉर्टजे याने दोन गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. तर भारत अ कडून हनुमा विहारीने 295 चेंडूंचा सामना करताना 14 चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी करून आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
प्रत्युत्तरात खेळताना सलामीवीर पीटर मेलन पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने दक्षिण आफ्रिका अ संघ दडपणाखाली आला होता. मात्र त्यानंतर
सॅरेल एर्वी आणि झुबेर हम्झा यांनी सामन्याची सर्व सूत्रे हाती घेताना बचावात्मक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना लगेचच दुसरे यश मिळू दिले नाही. यावेळी दोघांनीही सावध पवित्रा घेताना संघाचा धावफलक हलता ठेवण्याचे काम केले. दोघांनीही केवळ खराब चेंडूंवर फटके लगावले. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दडपण आले होते. यावेळी दोघांनीही दक्षिण आफ्रिका अ संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
संघाच्या 154 धावा झाल्या असताना 58 धावांवर खेळणाऱ्या सॅरेल एर्वीला बाद करत चाहलने भारतीय गोलंदाजांना तब्बल 36.3 षटकांनंतर सेलेब्रेशन करण्याची संधी दिली. एर्वी आणि हम्झा यांनी 36.3 षटकांत 154 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिका अ संघाचा डाव सावरला. एर्वी बाद झाल्यानंतर केवळ 9 धावांच्या अंतराने हम्झा परतला.झुबेर हम्झाने 125 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने 93 धावांची बहुमोल खेळी केली.
लागोपाठ दोन विकेट्‌स गेल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ दडपणाखाली आला असताना रॅसी व्हॅन डेर डुसेन आणि रुडी सेकंड यांनी सावध पवित्रा घेत दक्षिण आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा डुसेन 18 धावांवर तर सेकंड 35 धावांवर खेळत होता. भारताकडून युझवेंद्र चाहलने 62 धावा देत 2 गडी बाद केले, तर मोहम्मद सिराजने 51 धावांत 1 गडी बाद करीत त्याला साथ दिली.
संक्षिप्त धावफलक – भारत अ – पहिला डाव- 101 षटकांत सर्वबाद 345 (हनुमा विहारी नाबाद 148, अंकित बावणे 80, श्रेयस अय्यर 39, श्रीकर भारत 34, डुआन्ने ऑलिव्हर 63-6, ऍन्‍रिच नॉर्टजे 69-2),
दक्षिण आफ्रिका अ संघ- पहिला डाव- 59.5 षटकांत 3 बाद 219 (झुबेर हम्झा 93, सॅरेल एर्वी 58, रूडी सेकंड नाबाद 35, व्हॅन डेर डुसेन नाबाद 18, युझवेंद्र चाहल 62-2).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)