#CWC19 : दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय

मॅन्चेस्टर – फाफ ड्यु प्लेसिस, दुसेन आणि क्विंटन डी कॉकच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर कगिसो रबाडा आणि ड्‌वेन प्रिटोरियस यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला शेवट गोड केला.

यावेळी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 325 धावांची मजल मारत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 326 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाला 49.5 षटकांत सर्वबाद 315 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना दहा धावांनी पराभव स्विकारावा लागला.

यावेळी 326 धावांच्या पाठलागासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली.कर्णधार ऍरोन फिंच केवळ 3 धावा करुन परतल्यानंतर आलेला उस्मान ख्वाजा रिटायर्ड झाल्याने आलेला स्मिथही 7 धावा करुन परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 2 बाद 33 अशी अवस्था झाली. यानंतर आलेल्या स्टोइनिस आणि वॉर्नरने 63 धावांची भागिदारी करत संघाला शंभरीच्या जवळ पोहोचवले. मात्र, स्टोइनिस 22 धावांची खेळी करुन परतला. स्टोइनिस बाद झाल्यानंतर आलेला मॅक्‍सवेलही 12 धावांची खेळी करुन परतल्याने ऑस्ट्रेलियाची 4 बाद 119 अशी अवस्था झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या केरीला साथीत घेत डेव्हिड वॉर्नरने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी करायला सुरूवात केली. यावेळी दोघांनीही 108 धावांची भागिदारी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले.

मात्र, शतकझाल्यानंतर मोठे फटके मारण्याच्या नादात वॉर्नर 122 धावा करुन बाद झाला. तर, केरी 85 धावांची खेळी करुन परतला. यानंतर मिचेल स्टार्क आणि जोस बेहेरेनडॉर्फयांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला विजयानजीक आणले. मात्र, कगिसो रबाडाने उस्मान ख्वाजा (18) आणि मिचेल स्टार्क (16) यांना बाद करुन सामना पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडे वळवला.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत दमदार सुरुवात केली. सलामीवीर डिकॉक आणि मार्करम यांनी 12 षटकात 79 धावांची सलामी दिली. दोघांनी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कला चांगलाच चोप दिला. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने डाव सावरला. त्याने दक्षिण आफ्रिकेला 27 षटकांत 150 धावांपर्यंत पोहोचवले.

अर्धशतकानंतर फाफने धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने 94 चेंडूंत शतक ठोकत आफ्रिकेला 265 धावांपर्यंत पोहोचवले. पण, फाफ शतकानंतर लगेचच बाद झाला. फाफनंतर दसेनने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने अखेरच्या काही षटकांत केलेल्या दमदार 95 धावांच्या खेळीमुळे आफ्रिकेने 325 धावांपर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 6 बाद 325 (फाफ ड्यु प्लेसिस 100, वॅन डर दुसे 95, क्विंटन डी कॉक 52, मिचेल स्टार्क 2-59, नॅथन लायन 2-53) वि.वि. ऑस्ट्रेलिया 49.5 षटकांत सर्वबाद 315 (डेव्हिड वॉर्नर 122, ऍलेक्‍स केरी 85, कगिसो रबाडा 3-56, ड्‌वेन प्रिटोरियस 2-27).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)