‘टॉप-100’ शाळांची लवकरच निवड

संग्रहित फोटो

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संलग्नता : 455 शाळांची तपासणी मार्चअखेर


पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक शाळांचे अर्ज


निर्णय होताच जूनपासून सुरू होणार शाळा

पुणे – राज्य शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नता प्राप्त करण्यासाठी प्राथमिक यादीत निवड केलेल्या 455 शाळांची मार्च अखेर तपासणी पूर्ण होणार आहे. तपासणीत पात्र ठरलेल्या “टॉप-100′ शाळांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. यात इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यातल्या विविध भागातील शाळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके प्राप्त करणाऱ्या असाव्यात व मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी 14 ऑक्‍टोबर 2016 रोजी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 नोव्हेंबर 2017 रोजी निकष निश्‍चित करुन महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 13 शाळांना अस्थायी संलग्नता देण्यात आली. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी शासनमान्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळांकडून अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील 4 हजार 955 शाळांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 332, तर सर्वांत कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 34 शाळांनी अर्ज दाखल केले आहेत.

त्यातून तपासणीअंती 455 शाळांची प्राथमिक निवड यादी तयार करण्यात आली आहे. या शाळांची विशेष समितीमार्फत तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. या समितीत शासन, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला आहे.

गुणवत्तेनुसार उपलब्ध सुविधा, उत्तम शिक्षक, विविध घटकांचा समन्वय, व्यवस्थापन समन्वय आदींची कसून तपासणी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर सर्व नियमांच्या अंमलबजावणीत समाविष्ट शाळांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. नियामक मंडळाचा निर्णय होताच जूनपासून या शाळा सुरू करता येणार आहेत.
– विकास गरड, सचिव, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ.

शिक्षकांसाठी मेमध्ये शिबिर
प्राथमिक निवड यादीतील शाळांची तपासणी वेगाने होण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. नवीन अभ्यासपद्धती, मूल्यमापन पद्धती, बाल-मानसशास्त्र या विषयावर तज्ज्ञांकडून निवड झालेल्या शाळांसाठी निवासी शिबिर घेण्यात येणार आहे. येत्या मेमध्ये हे शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)