नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? यावरून अनेक नावे चर्चेत आहेत. सूत्रानुसार, काँग्रेस पक्षाचे नेतृत्व पुन्हा एकदा सोनिया गांधींकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. परंतु, यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास सोनिया गांधींनी नकार दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी राहुल गांधी यांनी घेऊन अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अनेक घडामोडींनंतर काँग्रेस पक्षाने अखेर राहुल गांधींचा राजीनामा स्वीकार केला. राहुल गांधींनी याआधीही काँग्रेस वर्किंग कमिटीला नवा अध्यक्ष निवडण्यासाठी १ महिन्याचा कालावधी दिला होता. परंतु, असे न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींना अध्यक्ष पदावर कायम राहण्यासाठी विनंती करण्यात आली.
राजीनामा देतेवेळी राहुल गांधी म्हणाले कि, काँग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी-नेहरू कुटुंबातील नसून बाहेरील असावा. परंतु, पक्षाचा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांच्या नावाचा आग्रह धरला. आता पुन्हा एकदा सोनिया गांधीच अध्यक्ष बनण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मध्यप्रदेशातील काँग्रेसचा युवा चेहरा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.