2011-12 च्या आर्थिक ताळेबंदाची फेरपहाणी होणार
नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी “युपीए’अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2011-12 साली दाखल केलेल्या प्राप्तीकर विवरणांची फेरतपासणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. त्यामुळे या दोघांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मात्र करतपासणीस परवानगी देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला गांधी यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीनंतरच ही फेरतपासणी करावी, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कॉंग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांनीही दाखल केली आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 2011-12 च्या प्राप्तीकर विवरणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. प्राप्तीकर विभागानेही गांधी कुटुंबीयांच्या प्राप्तीकराची फेरतपासणी करण्याच्या मागणीस दुजोरा दिला होता.
यंग इंडिया प्रा.लि. कंपनीच्या संचालक असलेल्या सोनिया आणि राहुल गांधी यांनी असोसिएटेड जर्नल या प्रकाशन कंपनीची 2 हजार कोटी रुपयांची मालमत्ता गैरमार्गाने ताब्यात घेतली, असा आरोप स्वामी यांनी केला आहे. गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त कॉंग्रेस नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे, आणि सॅम पित्रोदा यांचाही या प्रकरणात सहभाग आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा