समाधानातील सुख

उणिवांची जाणीव : प्रा. शैलेश कुलकर्णी

“समाधान मानण्यात असतं का?
समाधानाचा संबंध हा केवळ अंतर्मनाशीच निगडित असतो. आपण नेहमीच म्हणतो समाधान आपल्या मानण्यात असलं पाहिजे. पण म्हणजे नक्‍की काय करायला पाहिजे? जेणेकरून समाधान प्राप्त होईल. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्‍त तसं पाहायला हवं; प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्‍त ते उमजायला हवं; प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्‍त तसं समजायला हवं, प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे फक्‍त तसं जगायला हवं. आपण आपल्या उणिवा दूर करत गेलो आणि प्रत्येक बाबतीतील जाणीव करून घेत गेलो की समाधान मिळायला सुरुवात होतेच. पण आपण आपल्यांत काही उणिवा आहेत ह्याची जाणीवच करून घेत नाही, त्यामुळे असमाधानी राहतो.

सद्यस्थितीत अनेकदा साधेपणा म्हणजे भोळेपणा अथवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिक विचारसरणी आणि काही प्रमाणात अंधानुकरण ह्यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असल्याचं आपण सर्वच जण अनुभवत आहोत. एका अर्थी हे होणारे बदल आपला विकासच घडवत असतात. आपले केवळ नीटनेटके राहणे हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसणे आवश्‍यक झालं आहे. त्यामुळे आहे त्यांत समाधान मिळत आहे का? आपण प्राप्त परिस्थितीत सुखसमाधान मिळवू शकत आहोत का? अशा स्वरूपांच्या मनांत येणाऱ्या प्रश्‍नांमुळेच आपण दु:खी होत राहतो. कशातच समाधान मिळत नाही, असं म्हणत आपलं दु:ख मिरवत राहतो. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं ह्या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या, तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्‍यक झालं आहे. त्यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्याकडे अनेकजणांचा कल असल्याचं दिसून येत आहे. सुंदर आणि आकर्षक राहणीमानासाठी निश्‍चितच आर्थिकदृष्ट्या काही तरतूद करणं अनिवार्य ठरत असतं. ह्या राहणीमानाची नुसती सवय होऊन चालत नाही, तर असं राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी थोडाफार खर्चही करावा लागणं स्वाभाविक असतं.

“सुख म्हणजे काय?
जगी सर्व सुखी असा कोण आहे? का बरं असं म्हणावं लागतं? जगात सुखी असणाऱ्यांची संख्या खरंच नगण्य आहे का? अर्थात हे सर्व काही आपल्या बघण्याचा दृष्टिकोन ठरवत असतो. जसा चष्मा लावावा तसं दिसतं. आपला दृष्टिकोन जेवढा महत्त्वाचा असतो, तेव्हढाच आपल्याला दृष्टी कोण देतो, तो देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आपला प्रत्येक विचार आपल्याला काही विशिष्ठ अनुभूती देत असतो. अनेकदा आपण विचारांची सुरुवातच नकारात्मकतेनं करत असतो. आपल्याला अमुक एखादं काम जमणारच नाही, तमुक एक गोष्ट तशी असूच शकत नाही इत्यादी प्रकारच्या नकारात्मक विचारांचा थेट परिणाम आपल्या अंतर्मनावर, वर्तनावर, कालांतरानं व्यवहारावर होऊ लागतो. अर्थातच होणारा परिणाम देखील नकारात्मक असल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. सुख म्हणजे नक्‍की काय असतं…? ते केवळ ज्याचं-त्यानं अनुभवल्यावरच समजू शकतं. तसं बघितलं तर सुखाचा संबंध शरीराशी निगडित असतो.

सुख हे भोगण्यापेक्षा “समजण्यात अधिक” असतं, ह्याची जाणीव सतत असणं जरुरीचं असतं. एखादि गोष्ट आपल्याजवळ नसल्यावर आपण दु:खी होऊन ती मिळवण्याच्या मागे लागतो. ज्या क्षणी ती मिळते तो खरा सुखाचा क्षण, असा प्रत्येकाचा सर्वसाधारणपणे समज असतो. लगेच पुढच्या क्षणाला त्या गोष्टीची ओढ संपते आणि नवीन एखाद्या गोष्टीची ओढ लागायला सुरुवात होते. ती नवीन गोष्ट मिळवण्याची पुन्हा केविलवाणी धडपड सुरू होते. ती मिळेपर्यंत आपण दु:खी होतो. अर्धा ग्लास रिकामा असल्याचं दु:ख करत बसण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला असल्याचं सुख का मानू नये ? देवनागरी-मराठी लिपितील “सुख” हा शब्द सहज वापरता येणारा, बोलायला सोपा आहे; प्रत्यक्षांत ते “सुख” मिळवताना करावा लागणारा प्रवास हा प्रयास ठरत असल्याचं आपण अनुभवतो. तसंच “दु:ख” हा शब्द बोलताना जरा जड जातो आणि लिहिताना पुढे दोन टिंबरूपि अश्रुंचे थेंब असल्याची प्रचीती येते. सुख म्हणजे फुलपाखरासारखं मोहक, चंचल, निसटतंच हातात येणारं असतं. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून सोडते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वीच ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते. आपण तसेच काठावर निथळत्या सुखाला स्पर्श करत राहतो. हवं असलेलं सगळं देऊन कोणीतरी चकवल्यासारखं वाटत राहतं.

“सुख मिळतं आणि दिसतं का?
प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते. अर्थातच ती ज्याच्या त्याच्या अनुभूतीवर ठरत असते. कोण कशात सुख शोधेल ते सांगता येत नाही, समजूही शकत नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं? हे ज्यानं त्यानं अनुभवल्या शिवाय कळू शकत नाही. सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतोच; ते काहींना ओंजळभर मिळतं, तर काहींना रांजणभर मिळतं. पण त्यांतून मिळणारा आनंद ज्याला कळतो तोच जगणे शिकतो. दु:खाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच; फक्‍त थोडी वाट पाहायची असते. विमानालासुद्धा उडण्याअगोदर धावपट्टीवर वेगाची सीमा गाठण्यापर्यंत धावावंच लागतं, तेव्हा कुठे जाऊन ते आकाशांत भरारी मारू शकतं, उडू शकतं. आयुष्याचा सुद्धा हाच नियम आहे; सुखाच्या आकाशांत उडण्या अगोदर दु:खाच्या धावपट्टीवर सहनशीलतेची सीमा आपल्याला गाठावीच लागते, त्याच्याशिवाय आपण सहज आनंदाची भरारी घेऊ शकत नाही. लहान सहान गोष्टीतही सुख, शोधलं तर सापडतं. सुख म्हणजे काय असतं तसं बघितलं तर आपण दैनंदिन जीवनांत नेहमीच अनुभवत असतो. जसं खूप दिवसापासून हरवलेली एखादी अत्यंत आवडीची वस्तू अचानक सापडते तेव्हा, ट्रॅफिक जॅममध्ये आपण फसलेले असताना शेजारच्या गाडीतलं लहान मूल आपल्याकडे बघून गोड हसतं तेव्हा, आकाशात पूर्ण गोल चंद्र दिसतो तेव्हा जे काही अंतर्मनाला होतं ना; त्यांतही अनोखं सुख सामावलेलं असतं. म्हणजेच सुख एखाद्या वस्तुसारखं दिसत नसलं तरीही आपल्याला मिळालेल्या सुखाची अनुभूती आपल्या चेहेऱ्यावर दिसू लागते. कमी अधिक प्रमाणात सर्वांच्याच वाटेला कष्ट, दु:ख येत असतात, परंतु त्यावेळी मन प्रसन्न, आनंदी ठेवलं की सुख आपोआप आपल्याला शोधत येतं. मन प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यासाठी दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचाराने करण्याची जरूरी असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे.

“सुख, समाधानापेक्षा शांती महत्त्वाची असते का?
आपल्यापैकी प्रत्येकाची सुख आणि समाधान मिळवायची धडपड सदोदित सुरू असते. खरं तर सुख आणि समाधान ह्या दोन्ही इतकीच शांती महत्त्वाची असते. सुख शरीरासाठी, समाधान मनासाठी आणि शांती मात्र अंतरात्म्यासाठी मिळवायची असते. अनेकदा आपल्याकडून आपल्याच अंतरात्म्याच्या शांतीची आपल्याला जाणीव होत नाही, त्याचा विचारही मनाला स्पर्श करत नाही. जर काही खरंच आपल्याकडून आपल्या अंतरात्म्यासाठी होत असेल, ते त्याचं स्वरूप काय असतं ? त्याच्या शांती साठी खरंच आपण नित्यनेमाने काही करतो का? त्याची गरज नसते का ? अंतरात्म्याच्या शांतीतून खरं तर अनेक प्रकारे सुख आणि समाधान मिळायला सुरुवात होत असते, हे समजून घेणं महत्त्वाचं आणि म्हणूनच आवश्‍यक असतं. प्रत्येक बाबतीत आपण स्पर्धकाची भूमिका बजावत असतो. मीच सर्वांपेक्षा पुढे कसा जाऊ शकेन? मोठा कसा होऊ शकेन? श्रेष्ठ कसा ठरू शकेन? अशा अनेकविध बाबींमुळे खरं तर आपण सुखापासून दूर जात राहतो. सुखाला प्राप्त करताना असमाधानी, दु:खी होत जातो. अनियंत्रित विचारांनी अनावर मनामुळे आपली प्राणऊर्जा निघून जात असते. त्यामुळे आपण निराश, विफल होऊन जातो. ह्या “अनावर’ परिस्थितीतून “स्थिर’ कसं बनावं? अशा परिस्थितींना आपण कसा शांत मनाने प्रतिसाद देऊ शकतो? आपण प्रत्यक्षपणे मन:शांती मागू किंवा प्राप्त करू शकत नाही, मात्र आपण मनाला “शांत स्थिर’ होण्यासाठी तयार करू शकतो. ध्यानामुळे मन विनासायास शांत होण्यास मदत होते. कसं, ते समजून घेतलं पाहिजे.

“नेमकं हवंय काय?
सुख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. दिवसभर नुसतं गेट उघडणे-बंद करणे, असं अतिशय नीरस काम करणारा वॉचमन तुम्हाला पाहून येता जाता तोंडभरून हसतो, तेव्हा त्याचं कौतुक वाटतं. तो करत असलेल्या कामात त्याला काय हवंय आणि तेथील लोकांना काय हवंय हे त्याला नीट कळलेलं असतं. अनेकदा आपल्याला नेमकं काय हवंय हेच कळलेलं नसतं. आवडलेलं आणि निवडलेलं ह्यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्‍त तडजोड; कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. परंतु निवडलेलंच जेव्हा आवडायला लागतं, तेव्हा तडजोडीचा प्रश्‍नच उरत नाही. काही वेळा आवडीनं निवडायला सवड काढावी लागते, ह्याचीसुद्धा जाणीव होणं जरुरीचं असतं. सतत कपाळावर आठ्या घेऊन, महागड्या गड्यांमधून फिरणाऱ्या एखाद्या धनाढ्य व्यक्तीला बघितलं की, त्याचं सुख कुठेतरी हरवलंय असं वाटतं. सुखाचा पैशाशी काहीही संबंध नसतो. आपल्याला हवा तेव्हा आणि हवा तितका मिळणारा मानसिक आधार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपल्या प्रत्येकाच्या सुखदु:खाशी निगडित काय आहे, हे अभ्यासपूर्वक समजून घेणं अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित होतं. मन जर आनंदी असेल तर कोणतेही शारीरिक / मानसिक कष्ट जाणवत नाहीत, हेही तितकंच खरं असतं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)