सोलापुरमधील यंत्रमाग उद्योगाला घरघर !

खुली अर्थव्यवस्था आणि वाढत्या स्पर्धेमुळे चादर, टॉवेलची मक्तेदारी निघतेय मोडीत

सोलापूर: गिरणगाव म्हणून एकेकाळी सोलापूरची ओळख. मात्र मागील 15 वर्षांत सोलापुरातील सर्वच गिरण्या बंद पडल्या आणि सोलापूरची गिरणगाव म्हणून असलेली ओळख संपुष्टात आली. गिरण्या बंद पडल्यानंतर हजारो कामगार देशोधडीला लागले. सोलापुरातील लाखो कामगारांच्या हाताला काम देणारा एकमेव उद्योग म्हणून सध्या विडी आणि यंत्रमाग व्यवसायाकडे पहिले जात असतानाच आता खुली अर्थव्यवस्था आणि वाढत्या स्पर्धेमुळे यंत्रमाग उद्योगसुद्धा अंतिम घटका मोजतोय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजकारणी मंडळींनी फिरविलेली पाठ आणि कामगार संघटनांमुळे होणारी कामगारांची होरपळ या उद्योगाला रसातळाला नेण्याला कारणीभूत ठरत असल्याचे मत सोलापूरकरांमधून व्यक्त होत आहे. एकूणच यंत्रमाग उद्योगाला आर्थिक घरघर लागल्याने फुल्ल टाइम असलेला हा यंत्रमाग व्यवसाय आता पार्ट टाइम, तर कधी कधी चार दिवसांवर येऊन ठेपल्याने यंत्रमाग व्यवसाय चिंतेचे कारण बनला आहे. यामुळे सोलापूरचे ब्रॅंड असलेली सोलापूरी चादर आणि टॉवेलची मक्तेदारी मोडीत निघते कि काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी सोलापुरात 20 हजार यंत्रमाग होते. ती संख्या आज साडेचौदा हजारावर आली आहे. या उद्योगात प्रत्यक्ष रोजगार 50 हजारच्या घरात होता तर अप्रत्यक्षरीत्या 30 हजार असे एकूण 80 हजार लोकांची या उद्योगावर उपजीविका चालते. या व्यवसायातील देशांतर्गत एकूण उलाढाल सुमारे 800 कोटी इतकी असून सुमारे साडेचारशे कोटींची निर्यात होते.

मात्र सुत आणि रंग रसायनाच्या दरात होत असलेली सततची वाढ आदी विविध कारणांमुळे निर्यातीवर परिणाम होऊन उलाढालसुद्धा कमालीची घटली आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत बांगलादेश, चीन,व्हिएतनाम तसेच पाकिस्तानच्या तुलनेत भारतातून निर्यात होणाऱ्या वस्त्रांची किंमत जास्त असल्याने त्याचा निर्यातीवरसुद्धा परिणाम झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून यंत्रमागधारकांना विशेष सवलती मिळत नाहीत. वस्त्रोद्योग खात्याचे दोन्ही मंत्री सोलापूरचेच असतानासुद्धा यंत्रमाग उद्योगाला त्यांचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागत नसल्याचा एकंदरित चित्र आहे. स्वतंत्र असे पॅकेज देऊन शासनाने अंतिम घटका मोजत असलेल्या या व्यवसायाला उभारी देण्याची मागणी यंत्रमागधारकांमधून जोर धरत आहे.

सततच्या बंदचा फटका

कामगार संघटनांकडून विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने होतात. या दरम्यान कधी-कधी कामगार संघटन कारखाने बंदचे इशारे देतात. अशा वेळी कारखाने बंद राहिल्याने कारखानदारांचे तर नुकसान होतेच मात्र सर्वाधिक नुकसान कामगारांचे होते. कारखाने बंद असल्याने या बंदच्या कालावधीतील पगार कामगारांना मिळत नाही आणि त्यासाठी पुन्हा आंदोलन छेडले जाते. अशी अनेक आंदोलने वर्षभरात होत असल्याने त्याचा फटका बसतो. त्यामुळे “दुष्काळात तेरावा महिना’ याप्रमाणे कामगारांचीच परवड होताना दिसून येते.

पती यंत्रमाग, तर पत्नी विडी कामगार

सोलापूरच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग आणि विडी उद्योगही चालतो. पती आणि मुले दिवसभर यंत्रमाग कारखान्यात, तर पत्नी व मुली विडी वळण्याचे काम करतात. या व्यवसायाशिवाय दुसरा कोणताही रोजगार येथे उपलब्ध नाही. विडी व्यवसायही अडचणीतच आहे. दिवसभर हजार विडी वळल्यानंतर महिलांना साधारणपणे 90 रुपये मजुरी मिळते. तर दिवसभर म्हणजेच आठ तास यंत्रमागावर कान फाटेपर्यंत पायाला भिंगरी बांधून काम करायचे तेव्हा कुठे 180 ते 200 रुपये पगार पडतो. अशा एकूणच परिस्थितीतून मार्गक्रम करत असलेल्या या यंत्रमाग व्यवसायाला आता उभारी देणे काळाची गरज बनली आहे.

(फोटो ः सूर्यकांत आसबे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)